बोईसरमधील५० भिक्षेकरी मुले शिक्षणाच्या प्रवाहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरमधील५० भिक्षेकरी मुले शिक्षणाच्या प्रवाहात
बोईसरमधील५० भिक्षेकरी मुले शिक्षणाच्या प्रवाहात

बोईसरमधील५० भिक्षेकरी मुले शिक्षणाच्या प्रवाहात

sakal_logo
By

मनोर, ता. २२ (बातमीदार) : बोईसर शहराच्या खैरापाडा गेट तसेच शहराच्या अन्य भागात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम समाजात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या फलाही तंजीम संघटनेने पुढाकार घेतला आहे. शनिवारी फलाही तंजीम संघटनेचे पालघर झोन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि मुहम्मदी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने तीन ते पाच वर्षे वयोगटातील ५० भिक्षेकरी मुलांना शालेय साहित्यासह पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश देण्यात आला आहे.
खैराफाटा भागातील झोपडपट्टी भागात वास्तव्य करणाऱ्या आणि बोईसर शहर परिसरात तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुले भीक मागून उदरनिर्वाह करीत असल्याचे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या फलाही तंजीमचे सदस्य अयाज मार्कंडे यांच्या निदर्शनास आले होते. या भिक्षेकरी मुलांना शिक्षण देऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. भिक्षेकरी मुलांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि मुहम्मदी चॅरिटेबल ट्रस्टला विचारणा केली असता त्यांनी होकार दर्शवत मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्याने ५० भिक्षेकरी मुलांना तारापूर उर्दू शाळेत पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश मिळवून देण्यात आला. तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या मुलांना शाळेत ने आण करण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून शाळेत मध्यान्ह भोजन दिले जात आहे. शिक्षण विभागाकडून मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती तंजीम संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी बोईसरमध्ये आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी फलाही तंजीमचे अध्यक्ष सगीर डांगे, उपाध्यक्ष इरफान भुरे, इस्माईल खान, तक्की नाचन, मुजतबा डांगे, हबीब पटेल, थीम कॉलेज आणि मुहम्मदी चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी शरीफ भाई यांच्यासह मुले आणि त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात तंजीम संघटनेच्या पालघर झोनचे सचिव अयाज मार्कंडे, बदरुद्दीन आणि संघटनेच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

‘दानशुरांनी पुढे यावे’
समाजातील सक्षम दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत भिक्षेकरी मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आवाहन फलाही तंजीमचे अध्यक्ष सगीर डांगे यांनी केले. या मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून सुशिक्षित करा, तसेच येणाऱ्या पिढ्यांना शिक्षित केल्यास समाजासह देशाच्या विकासाला हातभार लागेल, असे मत पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक फरीद लुलनिया यांनी व्यक्त केले.