‘वाडिया’त प्रथमच यकृत प्रत्यारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वाडिया’त प्रथमच यकृत प्रत्यारोपण
‘वाडिया’त प्रथमच यकृत प्रत्यारोपण

‘वाडिया’त प्रथमच यकृत प्रत्यारोपण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात प्रथमच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या दोन वर्षांच्या बाळावर हे पहिले यकृत प्रत्यारोपण पार पडले. या बाळाला प्रोग्रेसिव्ह फॅमिलिअल इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस (पीएआसी- २) नावाच्या यकृताचा दुर्मिळ आजार झाला होता. त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता.
आयटी कंपनीत काम करणारे विक्रोळीतील योगेश आणि सुप्रिया वाझे याच्या निभिष या बाळाला जन्मतः पीएफआयसी-२ म्हणजेच प्रोग्रेसिव्ह फॅमिलिअल इंट्राहेपॅटिक कोलेस्टेसिस हा आजार होता आणि जन्मानंतर कावीळ झाली. निभिष अवघ्या २ वर्षांचा असताना पालकांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत केवळ प्रौढच नव्हे, तर मोठ्या संख्येने लहान मुलेदेखील आहेत. अनेकांनी दान केल्यास गरजू रुग्णांचा त्यातून जीव वाचू शकतो, असे यूकेचे डॅरियस मिर्झा बर्मिंगहम चिल्ड्रन रुग्णालय यांनी सांगितले.
...
पीएफआयसी- २ ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे. जगभरातील ५० हजार ते एक लाख नवजात मुलांपैकी एकाला हा आजार होतो. बालरोग यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता प्रतिदशलक्ष लोकसंख्येसाठी जगभरात १ ते २ इतकी आहे. पीएफआयसीमध्ये यकृताद्वारे पित्ताची मोठी समस्या उद्‍भवते, ज्यामुळे बाल्यावस्थेत गंभीर कावीळ होते आणि काही वर्षांत यकृत निकामी होते. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता.
- डॉ. ईरा शाह, प्राध्यापक व प्रमुख, हेपॅटोलॉजी विभाग
...
वडिलांनी केले यकृतदान
प्राध्यापक व बालरोग शस्त्रक्रिया डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले, की आम्ही बाळाच्या वडिलांना यकृत दानासाठी विचारले. ते शस्त्रक्रियेसाठी तयार झाले. या शस्त्रक्रियेला दात्यासाठी ७ तास आणि प्राप्तकर्त्यासाठी ८ तास लागले. या मुलाला ४ ते ५ वेळा छातीची फिजिओथेरपी करणे आवश्यक होते. आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. गेल्या एका वर्षात फक्त एका बालकाचे यकृत प्रत्यारोपण झाले आहे.
...
यकृत-किडनीची नवी सुविधा
दर महिन्याला ३ ते ५ संभाव्य यकृत प्रत्यारोपण रुग्ण दाखल होतात; मात्र पालकांकडे पुरेसे पैसे नसतात. तसेच आरोग्य विमा संरक्षण नसते. स्थानिक अधिकारी, धर्मादाय संस्था आणि इतर संस्थांकडून गरजवंत कुटुंबांना आर्थिक साह्य प्रदान केले जात आहे.
- डॉ. मिनी बोधनवाला, संचालिका, वाडिया रुग्णालये