रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक
रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अडवणूक

sakal_logo
By

वाशी, ता. २२ (बातमीदार) : रबाळे एमआयडीसी पूर्वला मोठ्या प्रमाणात कंपन्या असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना अनेकदा रिक्षा पकडण्यासाठी पादचारी पूल ओलांडून जावे लागते. एमटीएनएल परिसरात रिक्षाचालक बेशिस्तपणे वाहने उभी करीत असल्‍याने प्रवाशांची गैरसोय होते. चालकांकडून मनमानी भाडे आकारण्यात येत असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे.
रात्रीच्या सुमारास प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात येते. याबाबत विचारणा केली असता अडवणूक केली जाते अथवा भाडे नाकारण्यात येते.
रबाळे, भीमनगर परिसरातून रबाळे किंवा ऐरोली रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी रिक्षचालकांकडून शेअरिंगला तीस रुपये घेतले जातात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांशी हुज्जत घालण्याचा प्रकार घडतो. रबाळे रेल्वे स्थानकांच्या पश्चिम बाजूस सिडकोकडून पार्किंगसाठी असणाऱ्या जागेत रिक्षा उभ्‍या केल्‍या जातात; तर रबाळे पोलिस ठाण्याच्या बाहेरही बेशिस्तपणे रिक्षा उभ्‍या करण्यात येत असल्‍याने येणाऱ्या जाणाऱ्यांची अडचण होते.
रबाले रेल्वे स्थानकापासून रात्रीच्या वेळी गोठिवली तसेच घणसोली गावांमध्ये जाण्यासाठी रिक्षाचालक तयार होत नाही. तर अनेकदा या प्रवासासाठी अवाच्या सवा पैसे आकारले जातात. रिक्षाचालकांच्या मनमानीकडे पोलिसही दुर्लक्ष करीत असल्‍याचे प्रवाशांचे म्‍हणणे आहे.


आरटीओकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येते. कोणी रिक्षाचालकांची तक्रार आरटीओकडे केल्यास त्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

रबाळे रेल्वे स्थानकाबाहेर बेशिस्तपणे रिक्षाचालक वाहन पार्किंग करतात. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरांमध्ये जाण्यासाठी अडचण निर्माण होते; तर शेअंरिग रिक्षाला जोपर्यंत चार प्रवासी मिळत नाहीत, तोपर्यंत रिक्षा काढत नाहीत. त्यामुळे चौथा प्रवासी येईपर्यंत ताटकळत वाट बघावी लागते.
- चंद्रकांत वाळुंज, प्रवासी


एमआयडीसी परिसरातून रेल्वे स्थानकांपर्यंत सोडण्यासाठी रिक्षाचालकांनाकडून मीटरपेक्षा जास्त भाड्याची आकारणी केली जाते. तसेच अनेकदा भाडेदेखील नाकारले जाते.
- रमेश सूर्यवंशी, प्रवासी