व्यावसायिकांकडून ५३ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकांकडून ५३ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड
व्यावसायिकांकडून ५३ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड

व्यावसायिकांकडून ५३ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : ओळखीचा फायदा उचलत दोघा खंडणीखोरांनी नवीन पनवेल भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला खोट्या गुह्यात अडकवण्याची तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून तब्बल ५२ लाख ४१ हजाराची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदानंद वाकुर्ले व प्रथमेश वाकुर्ले अशी या खंडणीखोरांची नावे असून खांदेश्वर पोलिसांनी या दोघा खंडणीखोरांना सापळा रचून अटक केली आहे.

या प्रकणातील तक्रारदार राजेश पटेल हे नवीन पनवेल सेक्टर-३ भागात राहावयास असून त्यांचे त्याच परिसरात औषधांचे दुकान आहे. त्यांच्याकडे मिलिंद जाधव हा मागील १४ वर्षांपासून कामाला असून त्याच्या माध्यमातून पटेल यांची सदानंद वाकुर्ले यांच्याशी ओळख झाली होती. दरम्यान, श्रवणकुमार जैस्वाल हादेखील पटेल यांच्याकडे अनेक वर्षांपासून काम करत होता; मात्र त्याने काही महिन्यांपूर्वी स्वत:चे मेडिकल शॉप सुरू केले होते. श्रवणकुमार हा पटेल यांचे ग्राहक त्याच्याकडे वळवून त्यांचे नुकसान करत असल्याचे सदानंद याने पटेल यांना सांगितले होते. तसेच त्याबाबत श्रवण कुमारला समज देणार असल्याचे सांगत सदानंद हा श्रवणकुमार याच्या मेडिकल दुकानात समज देण्यासाठी गेला होता. या वेळी सदानंद याने आपल्या साथीदारांच्या मदतीने श्रवणकुमारला मारहाण केली.

त्यानंतर काही दिवसांनंतर श्रवणकुमार याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींना पाच लाख रुपये द्यायचे आहेत असे सांगून सदानंद याने पटेल यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्याला पैसे न दिल्यास त्यांना जेलमध्ये जावे लागेल असे सांगत भीती घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरून पटेल यांनी तीन लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतरही सदानंद आणि त्याच्या साथीदारांनी पटेल यांना रिव्हॉल्व्हर व रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या दाखवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. अशा‍ प्रकारे सदानंद याने मागील दीड वर्षात तब्बल ५२ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम उकळली. सततच्या या धमकीला वैतागून पटेल यांनी गेल्या महिन्यात खांदेश्वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी सापळा रचून सदानंद याला १९ नोव्हेंबर रोजी पटेल यांच्याकडून ५० हजार रुपये स्वीकारताना पकडले. याप्रकरणी पोलिसांनी खंडणीसाठी धमकावण्याबरोबरच इतर कलमाखाली अटक केली.