मंत्रिपदाच्या शर्यतीतून सरनाईक बाद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्रिपदाच्या शर्यतीतून सरनाईक बाद!
मंत्रिपदाच्या शर्यतीतून सरनाईक बाद!

मंत्रिपदाच्या शर्यतीतून सरनाईक बाद!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : मंत्रिमंडळ विस्तारात आणि भविष्यात ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी आमदार प्रताप सरनाईक यांची वर्णी लागणार, याची चर्चा राजकीय गोटात सुरू होती. ठाणे महापालिका परिसराच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी १ हजार ८०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी निम्मा म्हणजे तब्बल ९०० कोटींचा निधी प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा मतदारसंघाला देण्यात आला आहे. हा निधी मिळताच मंत्रिपदापेक्षा विकासकामे महत्त्वाची आहेत, असे बोलून आता आमदार सरनाईक यांनीच आपण मंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे शर्यतीत असलेल्या इतर ‘इच्छुकां’च्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. २२) पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. राज्य सरकारकडून आमदार सरनाईक यांनी ९०० कोटींचा निधी आणला असल्याने पुढील ४५ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात विविध विकास प्रस्ताव नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मार्गी लावण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आमदार सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माजी मुख्यमंत्र्यांना टोला
आधी आम्हाला निधी मागावा लागायचा; पण आता समोरूनच निधी मिळत आहे, असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. या निधीच्या माध्यमातून रस्ते, सुशोभीकरण, तसेच इतर नागरी कामे होणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे कौतुक
आमदारांनी पत्रे देण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासकामांसाठी निधी देत आहेत. ठाणे पालिका क्षेत्रासाठी १८०० कोटींचा विकासनिधी देताना ओवळा- माजिवडा मतदारसंघासाठी ९०० कोटी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले.

कामाख्या देवीने इच्छा पूर्ण केल्या
गुवाहाटीला असताना आम्ही कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. मनातल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येऊ, असे साकडे देवीला घातले होते. त्या पूर्ण झाल्याने २६ नोव्हेंबरला दर्शनाला जाण्यासाठी सर्व आमदार आग्रही आहेत, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

तर्कवितर्कांना ऊत
सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देणाऱ्यांमध्ये आमदार सरनाईक आघाडीवर होते. मविआ सरकारच्या काळात पाठीमागे ईडी लागल्याने ते शिंदे गटात सामील झाले, अशी चर्चा होती. त्यातच काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान सरनाईक यांना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र शंभुराज देसाई यांच्या गळ्यात ठाणे पालकमंत्रिपदाची माळ पडली असली, तरी भविष्यात सरनाईक यांना एखादे मंत्रिपद मिळून पालकमंत्रिपदी ते विराजमान होतील, असे तर्कवितर्क लावले जात होते.