नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राबवणार अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राबवणार अभियान
नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राबवणार अभियान

नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत राबवणार अभियान

sakal_logo
By

‘न्यूमोनिया’विरोधात पालिका सरसावली
नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान पालिकेचा विशेष उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : देशात पाच वर्षांखालील बालमृत्यूचा दर दरहजारी ७४ वरून ३७ वर आला आहे. मात्र, परिणामकारक उपचार व लस उपलब्ध असूनही बालकांना न्यूमोनियाच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. न्यूमोनियासारख्या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘सान्स उपक्रमा’अंतर्गत त्यापासून बचाव, प्रतिबंध व उपचार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार पालिका १२ नोव्हेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान सान्स उपक्रम राबवणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार पालिका राबवत असलेल्या सान्स उपक्रमाअंतर्गत २०२५ पर्यंत भारतात बालकांमधील न्यूमोनियामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी तीनपेक्षा कमी करण्याचे उपक्रमाचे प्रमुख ध्येय आहे.

खोकला आणि सर्दी वाढणे, श्वासोच्छ्श्वास वेगाने होणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ताप येणे इत्यादी न्यूमोनियाची प्रमुख लक्षणे आहेत. सान्स उपक्रमांतर्गत पालिका क्षेत्रात वस्ती पातळीवर व आरोग्य संस्था स्तरावर काही गोष्टी राबवण्यात येणार आहेत. त्याचा उपयोग गोवर प्रार्दुभाव टाळण्यासाठीही प्रभावीपणे राबवता येऊ शकतो, असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

उपक्रमाचे उद्दिष्ट
- बालकांमधील न्यूमोनियापासून प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिक स्तरावर जनजागृती करणे
- न्यूमोनिया आजार ओळखण्याबाबत पालकांना आणि काळजी घेणाऱ्यांना (केअर टेकर) सक्षम बनवणे
- न्यूमोनिया आजारास गांभीर्याने घेण्याबाबत आणि वेळेत उपचार-काळजी घेण्यासाठी त्याविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दूर करून पालकांच्या अन् केअर टेकरच्या वर्तणुकीत बदल करणे
- ‘न्यूमोकोकल कन्जगेट’ लसीबाबत जनजागृती करणे

वस्ती पातळीवर उद्दिष्ट
आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांद्वारे घरोघरी भेट देऊन आजारी बालकांचा शोध घेऊन त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर नजीकचे दवाखाने वा रुग्णालयात उपचार करण्यात येईल. जास्तीत-जास्त बालकांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस देण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.

प्रसूतिगृहे-रुग्णालय स्तरावर उपाय
वस्ती पातळीवरील गंभीर आजारी बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार आणि मार्गदर्शन करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल. उपक्रमाअंतर्गत पालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह, उपनगरीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या बाह्यरुग्ण विभागातील बालकांची तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल. बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळल्यास पालकांनी अधिक उपचारासाठी जवळचे आरोग्य केंद्र, दवाखाना, प्रसूतिगृह व रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.