खोकला घशाच्या खवखवीने बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोकला घशाच्या खवखवीने बेजार
खोकला घशाच्या खवखवीने बेजार

खोकला घशाच्या खवखवीने बेजार

sakal_logo
By

वाशी, ता. २२ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईकर खोकला आणि घशाच्या खवखवीने त्रासले आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील वातावरणातील बदलामुळे सध्या खोकला, घशाची खवखव याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. या रुग्णांच्या संख्येत साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
नवी मुंबईत थंडी वाढू लागली आहे. रात्री थंडी आणि दिवसा कमाल तापमान कायम असल्यामुळे उकाडा असे वातावरण आहे. या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागला असून काही दिवसांपासून नवी मुंबईतील नागरिकांच्या घशात खवखव आणि खोकल्याचा त्रास वाढला आहे. खासगी व सरकारी रुग्णालयांत घशातील खवखव व खोकल्याची तक्रार असलेल्या रुग्णांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पालिकेच्या असणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रासह कान-नाक-घसा विभागामध्ये काही दिवसांपासून घशाची खवखव, खोकला या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नेहमीच्या रुग्णांच्या तुलनेत २० टक्के रुग्ण हे घशाची खवखव व खोकल्याचे येत आहेत; मात्र यामध्ये काही रुग्ण अ‍ॅलर्जिक असून, काही रुग्णांच्या कोरोनापश्चात तक्रारी आहेत. कोरड्या खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. बदललेले वातावरण, नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम, हवेतील पराग कण, प्रदूषण यामळे नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती पालिकेच्या डॉक्टरांनी दिली. थंडीमुळे छातीचे विकार फप्फुसांचे आजार असणाऱ्या लोकांना जास्त त्रास होत आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी गरम कपडे घालणे. त्याचप्रमाणे थंडी वाजू नये यासाठी मफलर किंवा कानटोपी घालावी. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना काही काळ खोकल्याचा त्रास होतो. या रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याचे पालिकेचे डॉक्टर प्रशांत जवादे यांनी सांगितले.

------------
कोणती काळजी घ्यावी
खवखव, खोकल्याचा त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत
नाक व तोंडावर मुखपट्टी वापरावी
गरम पाण्याने गुळण्या कराव्यात
योग्य आहारांचे सेवन करावे