पारसिक हिलवरील खोदकाम संशयाच्या भोवऱ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारसिक हिलवरील खोदकाम संशयाच्या भोवऱ्यात
पारसिक हिलवरील खोदकाम संशयाच्या भोवऱ्यात

पारसिक हिलवरील खोदकाम संशयाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः बेलापूर येथील पारसिक हिल डोंगरउतारावर सुशोभीकरणाच्या नावाखाली विकसकाकडून करण्यात येत असलेले खोदकाम वादात सापडले आहे. सिडको आणि विकसकामध्ये झालेल्या करारावर पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या खोदकामाविरोधात पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलेल्या करारामध्ये वृक्षारोपण करण्याचे काम विकसकाला दिले आहे. त्या नावाखाली मोठ्या आकाराचे होर्डीग्ज विकसकाने लावल्याने पर्यावरणवादी आणि मानव अधिकार संघटनांनी विरोध केला आहे.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या निर्देशांच्या अंतर्गत पोलिस पारसिक हिलचा उतार खणणे, संरचना आणि महाकाय होर्डिंग्ज उभारण्यासारख्या कृतींद्वारे झालेल्या पर्यावरण अधिनियमाच्या उल्लंघनाची नवी मुंबई पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी स्वत: सिडकोच्या करार करण्याच्या अधिकारावर आणि पारसिक हिलच्या मालकीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. या व्यतिरिक्त संबंधित बिल्डरने कराराच्या अटींनुसार आयआयटीमार्फत मातीच्या स्थिरतेचा आणि वादळाच्या पाण्याच्या यंत्रणेचा अभ्यास करणे आवश्यक होते; परंतु ही अट पूर्ण केली गेलेली नाही, असे पर्यावरणवाद्यांच्या माहितीमध्ये उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कागदपत्रांची विकासकाकडे विचारणा केली आहे. पारसिक हिल ही मालमत्ता वन विभागाकडे असणे अपेक्षित असताना सिडको मालकी नसलेल्या मालमत्तेसाठी एखाद्या खासगी विकसकासोबत अवैध लीव्ह अँड लायसेन्स करार करत असल्याचे नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले.
सुशोभीकरणाच्या नावाखाली अगदी तात्पुरत्या स्वरूपाच्या संरचना किंवा होर्डिंग्जसाठीदेखील कोणतेही खोदकाम न करण्याच्या कराराच्या अटीचेदेखील उल्लंघन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------   

सिडकोचा करार म्हणजे सार्वजनिक उद्वेगानंतर केला गेलेला विचार आहे. खोदकामावर सारवासारव सुरू आहे. खोदकामासाठी आवश्यक असणारा आयआयटीचा अहवाल आलेला नाही. आला असता तर तो संबंधितांनी पोलिसांसमोर सादर केला असता. बेलापूर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी लवकरच याबाबत वन अधिकाऱ्यांशी बोलून काय ते समोर आणतील.
- विष्णू जोशी, संकलक, पारसिक ग्रीन्स फोरम