गावदेवाच्‍या पूजेसाठी आदिवासी बांधवांमध्‍ये उत्‍साह गावदेवाच्‍या पूजेसाठी आदिवासी बांधवामध्‍ये उत्‍साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावदेवाच्‍या पूजेसाठी आदिवासी बांधवांमध्‍ये उत्‍साह
गावदेवाच्‍या पूजेसाठी आदिवासी बांधवामध्‍ये उत्‍साह
गावदेवाच्‍या पूजेसाठी आदिवासी बांधवांमध्‍ये उत्‍साह गावदेवाच्‍या पूजेसाठी आदिवासी बांधवामध्‍ये उत्‍साह

गावदेवाच्‍या पूजेसाठी आदिवासी बांधवांमध्‍ये उत्‍साह गावदेवाच्‍या पूजेसाठी आदिवासी बांधवामध्‍ये उत्‍साह

sakal_logo
By

कासा, ता. २३ (बातमीदार) : आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पारंपरिक गावदेव पूजेला सुरुवात झाली आहे. पूर्वापार आदिवासी बांधव गावाचा रक्षक म्हणून गाववेशीवरील गावदेवाची पूजा करत आले आहेत. दिवाळीनंतर जिल्ह्यात दररोज एका गावामध्ये ही पूजा आयोजित केली जाते. त्यामुळे गावामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळते.
पावसाळ्याच्या सुरुवातीला कोलीचा देव म्हणून गावदेवाची पूजा केली जाते. यानंतर देवाला पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात उगवणारी कोली भाजीचा नैवेद्य अर्पण करून मगच घरोघरी कोली भाजीचे सेवन केले जाते. त्यानंतर गावात साखरपुडा, लग्न, नवीन बांधकाम व इतर शुभकार्य थांबवले जातात व सर्व बांधव शेतीच्या कामात व्यग्र होतात, अशी परंपरा आजही इथे पाळली जाते. पावसाळ्यानंतर शेतीची कामे उरकल्यावर गावदेवाची पूजा करून मगच शुभकार्यांना सुरुवात केली जाते.

..........................
तीन दिवस पूजेचा कार्यक्रम
साधारणतः दिवाळी झाल्यावर सर्व गावांमध्ये गावदेव पूजेला सुरुवात होत असते. बाहेरगावी कामासाठी गेलेला कामगारवर्गदेखील गावदेव पूजेदरम्यान गावात दाखल होत असतो. गावातील प्रत्येक कुटुंब गावदेवपूजेसाठी वर्गणी काढून पूजेसाठी देत असतात. गावदेव मंदिरात वाघोबा देवाची पूजा केली जात असून वाघोबा देवाला सर्व गावाचा रक्षक मानले जाते, म्हणून त्याला गावदेव म्हणतात. पूजेचा कार्यक्रम सलग तीन दिवस चालतो. तिसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य देऊन सर्व गावात प्रसाद वाटला जातो.
............................................
दिवसभर गाव बंद ठेऊन वेशीबाहेर मुक्काम
दर पाच वर्षांनी एकदा पूजेदरम्यान गावाच्या वेशीवर तोरण बांधले जाते. त्या दिवशी गावातील घरे आणि बाजारपेठ बंद ठेऊन सर्व कुटुंबे आपल्या परिवारासोबत पहाटे-पहाटे आपले बिऱ्हाड घेऊन गावाच्या वेशीबाहेर किंवा जंगलात जातात व तेथेच दुपारचे जेवण बनवून जेवण करून संध्याकाळी सहा-सात वाजेदरम्यान गावाच्या वेशीवर जे तोरण बांधले जाते त्या तोरणाच्या खालूनच गावात प्रवेश करत असतात. तशी परंपरा शेकडो वर्षांपासून गावागावात जपली जाते आहे.

........................................
पारंपरिक वाद्यांतून यात्रेचा आनंद
ही गावदेवाची पूजा झाल्याशिवाय आठवडा बाजार भरू दिला जात नाही. वाडवडिलांपासून ही प्रथा अजूनही त्याच जोमाने आणि उत्साहाने साजरी करण्यात येत असून पूजेदरम्यान गावातील सर्व पुरुष गावदेवाच्या मंदिरात पूजेसाठी एकत्र येत असतात. पूजेदरम्यान गावात चैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळते. आदिवासी बांधव पारंपरिक वाद्य वाजवून त्यावर गाणी गाऊन नाचून आपला आनंद व्यक्त करतात. काही गावांमध्ये गावदेव पूजेनिमित्त यात्रा भरवल्या जातात. यात्रेत आजूबाजूच्या गावखेड्यातील आदिवासी बांधव गावदेवाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचून-गाऊन नाचगाण्याचा मनसोक्त आनंद घेतात.

..........................................
शेवटच्या दिवशी मांसाहारी, शाकाहारी जेवणाचा प्रसाद
पूजेनिमित्त गावदेव मंदिरात भगत, भाविक रात्रभर जागरण करतात. वाद्य वाजवून देवाची गाणी गायली जातात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेदरम्यान ग्रामस्थ आपल्याकडील शिधा, काही दक्षिणा गावदेव मंडळाकडे जमा करतात. त्यातून पूजेचा खर्च भागवला जातो. शेवटच्या दिवशी संपूर्ण गावकऱ्यांना शाकाहारी व मांसाहारी जेवण प्रसाद म्हणून दिले जाते. यानंतर सर्व नियमित कामे सुरू केली जातात.

...............................
गावदेव पूजेदरम्यान गावातील वाडवडील, तरुणवर्ग आवर्जून उपस्थिती दर्शवतात. त्यामुळे गावात काही नवीन नियम लावायचे असतील, गावातील दोन पक्षातील वाद-विवाद, भांडणे, त्याव्यतीरिक्त इतर काही प्रश्न असतील, तर ते सर्वांच्या समक्ष सर्वानुमते सोडवले जातात. हा न्याय करताना सर्वांना आपले मत व्यक्त करण्याची अभिव्यक्ती असते. एकूणच पूजेदरम्यान गावात सामाजिक बांधिलकी जपली जाते.
- जयप्रकाश कोदे, माजी उपसरपंच, सोनाळे