चक्‍क स्मशानभूमीत वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चक्‍क स्मशानभूमीत वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’
चक्‍क स्मशानभूमीत वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’

चक्‍क स्मशानभूमीत वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : अंधश्रद्धेला फाटा देत नवीन विचारांचा पायंडा पाडण्यासाठी मोहने येथील गौतम मोरे यांनी आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला. मोरे यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनीदेखील मोठ्या उत्साहात स्मशानभूमीत येत वाढदिवसाचा आनंद लुटला. स्मशानभूमी हे अपवित्र ठिकाण मानले जाते. रात्री येथे गेले की भुते मागे लागतात, अशा अनेक अंधश्रद्धा नागरिकांच्या मनात आहेत. या विचारांना फाटा देत नवीन विचार रुजविण्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, या उद्देशाने यंदाचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करण्याचे ठरविल्याचे यावेळी मोरे यांनी सांगितले.

कल्याणजवळील मोहने येथील उल्हास नदीकाठच्या स्मशानभूमीत रात्री १२ वाजण्‍याच्या सुमारास गौतम यांनी आपला वाढदिवस केक कापून व नातेवाईकांना चिकन बिर्याणी देत साजरा केला. स्मशानभूमी म्हटले की, सर्वसामान्य माणसाच्या उरात धडकी भरते. दुपारी १२, सायंकाळी ७, रात्रीचे १२ वाजले की स्मशानभूमीजवळून जाणे अनेक जण आजही टाळतात. वंशपरंपरागत चालत आलेल्या समज-गैरसमजातून पिंपळ, वडाचे झाड, ओढा, विहीर, स्मशानभूमी आदी ठिकाणी भुतांचे वास्तव्य असते, असे किस्‍से ऐकायला येतात. केवळ लहान मुले नाही तर आबालवृद्धांचा देखील या संकल्पनांवर विश्वास असतो. याच संकल्पनांना छेद देण्यासाठी, तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या चळवळीतील खारीचा वाटा उचलण्यासाठी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचा विचार केला. नातेवाईक, मित्रमंडळी यांनीही मला पाठिंबा दिला.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वेगळा प्रयोग
सुशिक्षित तरुण-तरुणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत स्वतःला झोकून देत काम करतात; तर दुसरीकडे सुशिक्षित असणारा समाजातील काही घटक अंधश्रद्धेपोटी कोंबड्या, बकऱ्याचे बळी व उतारा देत आहे. भूतबाधा, भानामती यांवरही आज अनेकांचा विश्वास आहे. महापुरुषांचे विचार कागदावरच राहिले असून जे अस्तित्वात नाही त्यावर नागरिकांचा विश्वास आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी एक वेगळा प्रयोग आम्ही केला. रात्रीच्या वेळेसही महिला, लहान मुले स्मशानभूमीत आली होती. यावेळी सर्वांनी चिकन बिर्याणी खाल्ली आणि त्यांना याचा कोणताही त्रास झालेला नाही. हेच आम्ही यातून दाखवून दिल्याचे मोरे यांनी सांगितले.