आम्ही लढणार जनतेच्या साथीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही लढणार जनतेच्या साथीने
आम्ही लढणार जनतेच्या साथीने

आम्ही लढणार जनतेच्या साथीने

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : किसननगर येथे शिंदे गटाकडून ठाकरे गटावर हल्ला करण्यात आला. तसेच, अनेक गुन्हे दाखल झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचा दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सांस्कृतिक शहर असलेली ठाण्याची ओळख, तुमच्या या अशा वागणुकीमुळे गुंडागर्दी खपवून घेणारे ठाणे अशी व्हायला वेळ लागणार नाही. आमच्या संयमाला भ्याडपणा समजू नका. आम्ही लढणार कायद्याने आणि लोकशाहीने, तसेच जनतेच्या साथीने. आम्हाला तडीपार करा, खोट्या तक्रारी टाका, आमच्या मागे चौकशी लावा, गटबाजी करा किंवा अंगावर यायचे तर अंगावर, हा संघर्ष थांबणार नाही, असे विचारे यांनी म्हटले आहे.

महिलांना मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जाणारे शिवसैनिक बाळासाहेब किंवा धर्मविरांचे शिवसैनिक असू शकत नाही. पोलिस तुमच्या दबावाला बळी पडत नाहीत म्हणून तुम्ही पोलिस इन्चार्जकडे तक्रार करता आणि गुंडाकडून आमच्यावर हल्ला घडवता. हेच का तुमचे हिंदुत्व, असा सवालही या व्हायरल व्हिडीओमध्ये ठाकरे गटाने शिंदे गटाला केलेला आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या तीन मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला सत्याच्या बाजूने लढायचे ठरवले. म्हणून संयम कायम आहे. कधी काळी हातात हात घेऊन भगव्यासाठी झटणारे शिवसैनिक आज एकमेकांमध्ये लढतात. हे चित्र ठाण्याने कधीच पाहिले नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांनो तुम्ही जनतेची दिशाभूल करताय किंवा तुमची दिशाभूल झाली आहे. बाळासाहेबांनी किंवा धर्मविरांनी ही शिकवण दिली नव्हती. समाजकारणाच्या पडद्याआड राजकीय उद्देश केव्हाही साधला नाही, त्यांनी अन्यायाविरुद्ध फक्त संघर्ष केला. त्याचे फलित म्हणजे ही शिवसेना, असे विचारे या व्हिडीओत म्हणतात. तुम्हाला फक्त सत्तेची पडली आहे म्हणून ठाण्यात तुम्हाला विरोध करणाऱ्या शिवसैनिकांवर तुम्ही ठोकशाही दाखवता, असेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सात तास पोलिस ठाण्याच्या बाहेर तमाशा करणे यालाच तुमची मर्दानगी समजता काय, असा सवाल उपस्थित केला आहे.