मिरा भाईंदर शहर गोवरमुक्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा भाईंदर शहर गोवरमुक्‍त
मिरा भाईंदर शहर गोवरमुक्‍त

मिरा भाईंदर शहर गोवरमुक्‍त

sakal_logo
By

भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात सध्या गोवरची लागण झालेले एकही बालक नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. याआधी मिरा-भाईंदरमध्ये तीन रुग्ण आढळून आले होते. मात्र हे तीनही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गोवरचे लसीकरण न झालेल्या मुलांना लस देण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत गोवरचा उद्रेक झाल्यानंतर या आजाराने मिरा-भाईंदरमध्येही चंचुप्रवेश केला होता. शहरातील एकंदर तीन मुलांना त्याची लागण झाली होती. मात्र, ही लागण सौम्य स्वरूपाची असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आता ही तीनही मुले आजारातून पूर्णपणे बरी झाली आहेत. दरम्यान, रुग्ण आढळलेल्या परिसरातील पाचशे घरांमध्ये आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र, आतापर्यंत गोवरची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने यांनी दिली.
लसीकरणाचे सत्र
आरोग्य विभागातील ११३ आशा सेविका व ७१ प्रसविका यांच्या माध्यमातून गोवरचे लसीकरण न झालेल्या मुलांचाही शोध आरोग्य विभागाने सुरू केला होता. शिवाय अंगणवाडी सेविका व त्यांचे मदतनीस यांनाही ही जबाबदारी देण्यात आली होती. लसीकरण न झालेल्या मुलांच्या लसीकरणासाठी विशेष लसीकरण सत्रेही आयोजित करण्यात आली होती. सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या पाच वर्षांपर्यंतच्या सर्व लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार पहिल्या डोससाठी पात्र ७९० लाभार्थ्यांपैकी ७८१ व दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या १११५ लाभार्थ्यांपैकी १०८९ लाभार्थ्यांना गोवरची लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या वेळी उपस्थित नसलेल्या अथवा आजारी असलेल्या मुलांनाही लवकरच लशीचे डोस देण्यात येणार आहेत.
शंभर टक्के मुलांचे लसीकरण
सर्वेक्षणादरम्यान गोवरचे संशयित रुग्ण आढळले तरी त्याला लगेचच ‘अ’ जीवनसत्त्वाचे दोन डोस चोवीस तासांच्या अंतराने देण्यात येत आहेत. गोवरचा संशयित रुग्ण आढळला तर रुग्णाच्या घशातील स्रावाचे, रक्ताजलाचे नमुने हाफकीन प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही गोवरची लक्षणे दिसत असलेला रुग्ण आढळून आला तर त्याची माहिती महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला देण्याबाबत आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या निर्देशानुसार डिसेंबर २०२३ पर्यंत गोवरचे निर्मूलन करण्यासाठी शंभर टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त दिलीप ढोले यांनी दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. नंदकिशोर लहाने यांनी दिली.

-----------------------