वाशी सार्वजनिक रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशी सार्वजनिक रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
वाशी सार्वजनिक रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

वाशी सार्वजनिक रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ ः नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय हे सर्वसाधारण नागरिकांसाठी महत्त्वाचा वैद्यकीय आधार आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने रुग्ण विविध आजारांवरील उपचारांसाठी येतात. नुकतीच रुग्णालयामध्ये अत्यंत गुंतागुंतीची पाठीच्या आजारावर शस्‍त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सलग तासभर चाललेली ही शस्‍त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कौतुक केले.
६४ वर्षांच्या एका व्यक्तीला मागील २ वर्षांपासून पाठदुखी आणि पाठीमागे खालील डाव्या बाजूस तीव्र वेदना होत होत्या. दुखणे इतके जास्त होते की आठ- दहा मिनिटे चालणेही त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले होते. व्यक्तीची एमआरआय चाचणी केली असता त्यामध्ये लंबर कॅनल स्टेनोसिस अर्थात नसांमध्ये अत्यंत कमी जागा झाल्याचे निदर्शनास आले. नियोजित पीजी कॉलेजसाठी नियुक्त केलेले प्राध्यापक डॉ. प्रवीण पाडळकर आणि सहायक प्राध्यापक डॉ. सुमीत सोनवणे यांनी या रिपोर्टसची बारकाईने पाहणी करून काहीशी कठीण असलेली ही शस्त्रक्रिया नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयामध्येच करण्याचे निश्चित केले. स्पाइनल ॲनेस्थेसिया अंतर्गत लंबर डिकन्प्रेशनने ही शस्त्रक्रिया १ तास १५ मिनिटांच्या कालावधीत त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. या शस्‍त्रक्रियेमुळे रुग्ण त्याच्या लक्षणांपासून पूर्णपणे मुक्त होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाच्या रुग्णालयात साधारणत: २ ते २.५ लाख इतका खर्च आला असता. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील ही शस्त्रक्रिया अगदी विनामूल्य यशस्वीपणे पार पडलेली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अनेक वर्षांनंतर काहीशी कठीण अशी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडलेली असून आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
------------------
वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयामुळे रुग्णालय अधिक सक्षम होणार
नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरू करून पहिल्या टप्प्यात मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपॅडिक, गायनॅकोलॉजी आणि पिडियाट्रिक अशा ५ शाखा सुरू होणार आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचेमार्फतही प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.
पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेजमुळे प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी होईल. याद्वारे महापालिका रुग्णालयात सर्जिकल इन्टेसिव्ह केअर, मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडियाट्रिक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी ॲण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.