नळ आले, पाण्याची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नळ आले, पाण्याची प्रतीक्षा
नळ आले, पाण्याची प्रतीक्षा

नळ आले, पाण्याची प्रतीक्षा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलजीवन मिशनअंतर्गत युद्धपातळीवर घरगुती नळजोडणीचे काम सुरू आहे; परंतु पाणीपुरवठा योजनांचे काम तितक्याच संथ गतीने सुरू असल्‍याचे चित्र रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५ लाख ४५ हजार कुटुंबांना घरगुती नळजोडणीसाठी १ हजार ४४४ जलजीवन योजनेअंतर्गत आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ८६६.७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत; तर १,२४३ योजना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्‍यक्षात मात्र बहुतांश योजनांचे काम सुरूच झाले नसल्‍याचे समोर येत आहे.

दर वर्षी पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांना जलजीवनमुळे दिलासा मिळाला आहे. नव्या निकषानुसार, प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी दररोज मिळण्यासाठी केंद्राने योजना सुरू केली आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात ज्या कुटुंबांना नळजोडणी केली आहे, त्यांना पुरेशा प्रमाणात पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारी लाभार्थी कुटुंबांच्या आहेत.
उरण तालुका हा १०० टक्‍के नळजोडणीचा तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे, प्रत्‍यक्षात वस्तुस्थिती वेगळी असून येथे नोव्हेंबर महिन्यापासूनच महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. ज्या कुटुंबांना नळजोडणी करून दिली आहे, त्यांना पूर्वी अस्‍तित्वात असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेतूनच पाणी दिले जात आहे; मात्र हे पाणी अत्‍यल्‍प प्रमाणात असल्याच्या तक्रारी लाभार्थी कुटुंबाच्या आहेत.
२०२४ पर्यंत शंभर टक्के नळजोडणी असलेला जिल्हा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कुटुंबांना नळजोडणी करून घेण्यावर ग्रामसेवकांचा भर आहे. जलजीवन योजनेत चांगले काम करणाऱ्या ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेकडून गौरविण्यात येत आहे; मात्र त्या नळांना पुरेशा प्रमाणात पाणी येत आहे किंवा नाही, याची कोणतीही चौकशी केली जात नाही.

अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनांमधून नळजोडणी दिलेल्या कुटुंबांना पाणी दिले जात आहे. जलजीवनच्या नव्याने येणाऱ्या योजनांमधून सर्व कुटुंबांना पुरेशा प्रमाणात पाणी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून ज्या योजना मंजूर होत आहेत, त्या प्रमाणात त्या योजनांचे काम सुरू होत आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

कोकणातील परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळी आहे. नैसर्गिक कारणांमुळेही योजना नादुरुस्त होतात, तर कधी लक्ष न दिल्याने योजनेचे काम रखडते. नुसते पाईप टाकले आणि नळ जोडले म्हणजे पाणी येईल असे नाही, तर त्यासाठी पाण्याचा पुरेसा स्रोत, गुरुत्वाकर्षणाने येणाऱ्या पाण्याचा वेग आणि साठवण टाकीची क्षमता असा सर्वांचा विचार करून काम होणे आवश्यक आहे. एक वर्षापूर्वी योजनांचा आराखडा मांडताना या सर्व गोष्टींचा विचार झाला होता, त्याची अंमलबजावणी प्रशासनाने घ्यावी.
- अदिती तटकरे, आमदार

जलजीवन योजनेवर दृष्टिक्षेप
तालुका /योजना/ कार्यादेश/ घरगुती नळ (टक्के)
अलिबाग/१०५/९७/७२.४०
मुरूड/ ५९/५९/
पेण/१०६/८४/५१.१६
सुधागड/९०/८०/६८.९७
पनवेल/१३२/१२५/८७.२२
उरण/२१/१८/१००.००
कर्जत/१२०/१०४/६४.५६
खालापूर/९०/८०/९१.४८
रोहा/१५७/१३६/७९.५९
माणगाव/१४७/१३५/८८.२६
तळा/५७/५२/७७.६४
म्हसळा/६१/५९/९५.७८
श्रीवर्धन/६६/६२/८४.२९
महाड/१५१/१००/८१.०२
पोलादपूर/८२/५२/७०.७३
एकूण / १४४४/१२४३

निवडीचे निकष

* ज्या गावातील भारत निर्माण, राष्ट्रीय पेय जल योजनेच्या ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या नादुरुस्त योजनेद्वारे घरपोच नळांची पुन्हा जोडणी करणे
* सतत टँकरने पाणीपुरवठ्याची गावे
* दुर्गम भागातील गावे
* पाण्याचे स्रोत असूनही डोक्यावरून पाणी आणावे लागणारी गावे
* योजनेचे काम सुरू करण्याकरिता गाव हागणदारीमुक्त होणे आवश्यक
* तीन वर्षांत टॅंकरने पाणीपुरवठा केलेल्या गावांना प्राधान्य