गोवरचे थैमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवरचे थैमान
गोवरचे थैमान

गोवरचे थैमान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २३ : मागील दोन ते अडीच वर्षांपासून थैमान घालणाऱ्या कोरोनाच्‍या लाटेनंतर स्वाईन फ्ल्यू आजाराने डोके वर काढले होते. या दोन्ही आजारांचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. अशातच पुन्हा गोवर या आजाराने डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये गोवरने बाधित बालकांची संख्या १२८ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक ११० गोवरबाधित हे एकट्या ठाणे जिल्ह्यातील असून, भिवंडी तालुक्यातील एका बालकाचा गोवरने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये गोवर बाधितांची संख्या अधिक असल्याचे सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गोवरबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली. त्यानंतर जिल्ह्यातील सहा महापालिकांसह ग्रामीण क्षेत्रात आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात एक हजार २०६ संशयित आढळून आले होते. त्यापैकी ८८८ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये ११० जणांना गोवरची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक ४४ गोवर बाधितांची संख्या एकट्या भिवंडीत असून एका बालकाचा या आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पालघर, रायगडमध्‍येही संसर्ग
पालघर जिल्ह्यातदेखील करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २११ संशयित आढळून आले असून त्यापैकी १६२ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये ११ जणांना गोवरचा संसर्ग झाला आहे; तर रायगड जिल्ह्यात १९४ संशयित आढळून आले असून त्यापैकी १४८ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये सहा जणांना गोवरची लागण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या आजाराने एकही बालक दगावले नसल्याची नोंद करण्यात आली आहे.
...............................
लसीकरणाला विरोध नको
नागरिकांनी लसीकरणाला विरोध करणे घातक आहे. काही नागरिक बालकांनी लस घेण्यास विरोध करत असतील तर ते प्राणघातक ठरू शकते. आजार आणि लसीकरण याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी जनजागृती आणि लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.
...........................................
कोट
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. बालकांचे गोवर लसीकरण झाले नसेल तर ते तत्काळ करून घ्यावे. लसीकरणाची व्यवस्था जिल्हा आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आली आहे. गोवरची लक्षणे आढळली तर ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावा. मात्र त्यात विलंब झाला तर धोक्याचे ठरू शकते.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.
..........................................
गोवरची लक्षणे
ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. नागरिकांना गोवरसदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांनी घरगुती उपाय करण्यात वेळ न घालविता नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.