सुपरमॅक्सचे १३२० कामगार देशोधडीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपरमॅक्सचे १३२० कामगार देशोधडीला
सुपरमॅक्सचे १३२० कामगार देशोधडीला

सुपरमॅक्सचे १३२० कामगार देशोधडीला

sakal_logo
By

हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : दाढी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लेडची निर्मिती करणारी अग्रगण्य कंपनी म्हणून देशातच नव्हे तर जगात नावाजलेली ठाण्यातील मे. सुपर मॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला अखेर टाळे लागले आहे. मागणी कमी झाली, उत्पादन घटले, देणी देण्यासाठीही पैसा नाही आणि कामगारांची अरेरावी वाढली अशी ढीगभर कारणे देत व्यवस्थापकांनी कंपनीबाहेर टाळेबंदीची नोटीस चिटकवली. या कंपनीत आजच्या घडीला १ हजार ३२० कामगार काम करत असून व्यवस्थापकांच्या या निर्णयामुळे ते हवालदिल झाले आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये १९४९ मध्ये आणि हैदराबादमध्ये आर. के. मल्‍होत्रा यांनी विद्युत मेटालिक ही कंपनी सुरू केली. दाढी काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लेड उत्पादनात या कंपनीने भरारी घेण्यास सुरुवात केली. टोपाझ, पनामा या ब्रँडने या कंपनीचे ब्लेड देशातच लोकप्रिय झाले. ऑस्ट्रेलियामध्ये येथून निर्यात होणाऱ्या ब्लेडवर तेथील कंपनीचे लेबल चिकटवून बाजारात विकले जायचे. हजारो कामगारांच्या हाताला काम देणारी ही कंपनी अनेक वर्षे सुरळीत सुरू होती, पण २०११ ला कंपनीच्या लौकिकाला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली. आर. के. मल्‍होत्रा यांच्यानंतर त्यांच्या राजीव आणि रॉकी या दोन मुलांच्या हातामध्ये कंपनीचा कारभार गेला.
कामगार संघटना आक्रमक
एकीकडे कंपनीची आर्थिक घसरण सुरू असताना येथील कामगार संघटना आक्रमक होऊ लागल्या. कंपनी व्यवस्थापकांविरोधात लढा तीव्र होऊ लागला. अगदी कंपनीच्या गेटबाहेर हाणामाऱ्याही झाल्या आहेत. व्यवस्थापकांनी लावलेल्या नोटीसमध्ये आर्थिक डोलारा ढासळला हे कारण दिले आहे; पण त्यासोबत कामगारांच्या गैरवर्तनावरही ठपका ठेवला आहे. चार महिने पगार होत नसेल तर कामगार आक्रमक होणार नाहीत का, असा सवाल राज्य राष्ट्रीय कामगार संघाने केला आहे.

लेबर कोर्टात धाव
व्यवस्थापनाने पगार थकवल्यावर कामगार संघटनेने आधी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कामगारांची देणी १० दिवसांत देण्याचे आदेश कंपनीला दिले. हैदराबाद येथील जमीन विकून कामगारांची थकबाकी देणार असल्याचे सांगण्यात आले, पण ही थकबाकी न देता कंपनीने आर्थिक कारण देत टाळेबंदीची नोटीस बजावली. त्यामुळे त्याविरोधात राज्य राष्ट्रीय कामगार संघाने लेबर कोर्टात धाव घेतली आहे.

कामगारांमध्ये चिंता
कंपनीमध्ये एक हजार ३२० कामगार काम करत आहेत. त्यातील काही कामगार सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर पोहचले आहेत; तर अनेक कामगारांची मुले शाळेत, महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत. कंपनीला टाळे लागल्यानंतर हातचे काम जाणार आहे. या उतारवयात कुठे दुसरीकडे नोकरी मिळण्याची आशा मावळली आहे. अशा स्थितीत संसार, मुलांचे शिक्षण, बँकांचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

हजारोंच्या जमिनीवर डोळा
एकेकाळी ठाणे शहराच्या वेशीबाहेर असलेली विद्युत मेटालिक कंपनी सुपरमॅक्स होईपर्यंत नागरीकरणामुळे मध्यवर्ती ठिकाणी पोहचली. कंपनीचा मोक्याच्या ठिकाणी म्हणजे तीन हात नाका येथे दोन भागांमध्ये सुमारे ८ एकर भूखंड आहे. या भूखंडाचा भाव हजारो कोटींच्या घरात आहे. या भूखंडाचे श्रीखंड लाटण्यासाठीच हे सर्व षडयंत्र सुरू असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.