अग्निशमनच्या वाहनांची अग्निपरीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निशमनच्या वाहनांची अग्निपरीक्षा
अग्निशमनच्या वाहनांची अग्निपरीक्षा

अग्निशमनच्या वाहनांची अग्निपरीक्षा

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २४ (बातमीदार) ः शहरात अनेक ठिकाणी नैसर्गिक किंवा इतर कारणांनी आपत्ती ओढवत असते. अशा वेळी अग्निशमन दल लोकांच्या मदतीस धावून येते. घटना घडल्यास तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यास अग्निशमन दलाची वाहने सज्ज ठेवणे गरजेचे असते. पण, अंबरनाथच्या अग्निशमन दलाच्या वाहनांना अरुंद रस्ते, गतिरोधक आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या सर्व अडथळ्यातून वाट काढत इप्सितस्थळी पोहोचायला वाहनांना उशीर लागतो. त्यामुळे कार्यवाही करण्यासही उशीर होतो. या सर्वांवर उपाय म्हणून पूर्वेकडे नवीन अग्निशमन विभाग सुरू करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत असून तशी मागणी करत आहेत.

अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये असणारे अग्निशमन दलाचे कार्यालय धोकादायक अवस्थेत असल्याने पश्चिम भागातील कोहोजगाव येथे बांधण्यात आलेल्या प्रशस्त इमारतीमध्ये काही महिन्यांपूर्वी स्थलांतरित करण्यात आले. पश्चिमेकडे असणारे अग्निशमन दल कार्यालय सुसज्ज आणि प्रशस्त जागेत आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अंदाजे २० गतिरोधक आहेत. याशिवाय शाळा, आठवडा बाजार भरतो. आगीसारखी घटना घडल्यास कोहोजगावपासून पूर्व भागात अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी जाण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. आनंदनगर एमआयडीसीचा परिसर पाले गावापर्यंत विस्तारला आहे. त्या ठिकाणी जाण्यासदेखील विलंब होतो.

अग्निशमन दलाचे वाहन अवजड असल्याने प्रत्येक वेळी वाहनाचा वेग कमी जास्त करणे चालकांना त्रासदायक ठरते. गतिरोधक, मध्येच उखडलेले पेव्हर ब्लॉक यामुळे अग्निशमन दलाचे वाहन चालवताना चालकांना अडथला येतो. अंबरनाथच्या पूर्व भागात एखादे अग्निशमन दलाचे वाहन ठेवल्यास पश्चिमेकडील अग्निशमन दलाचा ताण थोडा कमी होईल, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. पूर्व भागातदेखील अशी व्यवस्था करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी प्रशासनाकडे केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी अनंत राजे यांनीदेखील अशी मागणी केली होती. खेर विभागातील स्वामी समर्थ चौकात नगरपालिकेच्या शिवदर्शन बंगल्यात अशी व्यवस्था करण्याबाबत विचार सुरू होता. आता मात्र शिवदर्शन बंगल्यात नगररचना विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला.
-------
शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम भागात अग्निशमन दलाचे कार्यालय आणि सुसज्ज वाहने ठेवण्याची गरज ओळखून योग्य जागेची निवड सुरू आहे. अग्निशमन दलाचे कार्यालय सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
- डॉ. प्रशांत शेळके, अतिरिक्त मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका