पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अटक
पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अटक

पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अटक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : घरगुती कारणावरून पत्नीची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह घरात ठेवून फरारी झालेल्या आरोपी पतीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. विरार गुन्हे कक्ष तीनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने ही कारवाई केली. या आरोपीच्या विरोधात पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश विश्वकर्मा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून संजू सरोज असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व संतोष भुवन येथे हे कुटुंब राहत होते. १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घरगुती कारणावरून आरोपीने आपल्या राहत्या घरात पत्नीची गळा दाबून हत्या केली होती. मृतदेह घरातच ठेवून घराला बाहेरून कुलूप लावून तो फरारी झाला होता. याबाबत पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. विरार गुन्हे कक्ष तीनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी या आरोपीची माहिती काढली असता आरोपी हा उत्तर प्रदेशातील वाराणशी येथे त्याच्या मूळ गावी रेल्वेने गेला असल्याचे समोर आले. गुन्हे कक्ष तीन विरारच्या पथकाने उत्तर प्रदेश येथे जाऊन ललितपूर येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपीला पेल्हार पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पेल्हार पोलिस करत असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले आहे.