गोखलेपूल बंदीचा विमानप्रवाशांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखलेपूल बंदीचा विमानप्रवाशांना फटका
गोखलेपूल बंदीचा विमानप्रवाशांना फटका

गोखलेपूल बंदीचा विमानप्रवाशांना फटका

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गोखले पूल बंदीचा फटका आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांनाही बसत आहे. विमानतळाच्या टी-२ टर्मिनल उतरल्यावर अंधेरी पश्चिमेला जाण्यास प्री-पेड टॅक्सीचालक नकार देत आहेत. किंबहुना टॅक्सी चालकांनी अंधेरी पश्चिमेला सेवा देण्यात येणार नसल्याचे पत्रकच जाहीर केले आहे.
गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर परिसरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेता विमानतळावरून अनेक टॅक्सीचालकांकडून अंधेरी पश्चिमेकडे जाण्याबाबत नकारघंटा वाजवली जात आहे. एवढेच नव्हे तर काळी-पिवळी टॅक्सी चालकांनीकडून अतिरिक्त पैसे आकारण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. 
अंधेरी येथील रहिवासी असलेले सत्येन रोहरा यांनी मंगळवारी टी-२ टर्मिनलला उतरले. त्यानंतर त्यांनी प्री-पेड टॅक्सीची सेवा घेण्याचा प्रयत्न केला; मात्र टॅक्सीचालकांकडून टर्मिनलवर लावण्यात आलेल्या सूचनेमुळे त्यांना धक्काच बसला. अंधेरी पश्चिमेला जाण्याचे भाडे नाकारण्यात येत असल्याचे त्यांनी सेवा पुरवठादारांकडून कळवण्यात आले. राज्य सरकार आणि पालिकेच्या प्रकल्पांचा हा सामान्य नागरिकांना फटका असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवर दिली.
यश शहा यांनाही असाच अनुभव आला. सुमारे ४० मिनिटे हुज्जत घातल्यानंतर त्यांना अंधेरी पश्चिमेला प्रवेश नाकारण्यात आला. अंधेरीला जाण्यासाठी काळी-पिवळी टॅक्सी चालकांनी २०० रुपये जादा भाडे घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची प्रतिक्रिया शहा यांनी ट्विटरवर दिली. 
---
तोटा कसा भरून काढणार ?
अंधेरी पश्चिमेला जाण्यासाठी वाहतूक कोंडीत इंधन आणि वेळ बराच खर्ची घालावा लागतो. त्यामुळेच अनेक टॅक्सीचालक या ठिकाणचे भाडे घेण्यासाठी नकार देतात. तसेच अनेक टॅक्सीचालकांना या मार्गावर होणाऱ्या तोट्यामुळेच भाडे घेत नाही, परंतु जादा पैसे घेण्याचे समर्थन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया टॅक्सीमेन युनियनचे ए. एल. क्वाड्रोज यांनी दिली.