मैदान वाचवण्यासाठी जनआंदोलन करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदान वाचवण्यासाठी जनआंदोलन करणार
मैदान वाचवण्यासाठी जनआंदोलन करणार

मैदान वाचवण्यासाठी जनआंदोलन करणार

sakal_logo
By

जुईनगर, ता.२३ (बातमीदार)  ः वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी सिडकोने महापालिकेला दिलेल्या भूखंडावरून निर्माण झालेल्या वादात आता फोर्टी प्लस क्रिकेट संघाने उडी घेतली आहे. या भूखंडावर क्रिकेटचे मैदानऐवजी रुग्णालय झाल्यास आमरण उपोषणापासून ते आत्मदहन करण्याचा इशारा या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या भूखंडाचा फोर्टी प्लसचे पदाधिकारी बेकायदा वापर करीत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाचे बुधवारी पत्रकार परिषदेत फोर्टी प्लसच्या पदाधिकाऱ्यांनी खंडन केले.
नवी मुंबईतील भावी पिढीचा विचार केला तर खेळाची मैदाने वाचली पाहिजे याच उद्देशाने बेलापूरचे मैदान वाचविण्यासाठी ४० प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू, स्थानिक, प्रकल्पग्रस्त, शहरातील क्रीडाप्रेमी पर्यावरण प्रेमी एकत्र आले. बेलापूरचे मैदान खेळासाठी राखीव ठेवले नाही तर शांततेमध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून जण आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या मैदानाचा कोणताही व्यावसायिक वापर होत नसून, लवकरच असोसिएशनची कार्यकारणी बसून मैदान वाचवण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मैदान बचाव चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मैदान वाचवा हा संदेश देण्यात आला. मात्र आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूरच्या मैदानावर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बांधण्याचा केलेला आग्रह मागे घ्यावा, नाही तर जनआंदोलन केले जाईल असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला. फोर्टी प्लसच्या माध्यमातून मैदान वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाची तयारी खेळाडूंनी केली आहे. हे मैदान आरक्षित ठेवण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोर्टी प्लसच्या संघटनेतर्फे लेखी निवदन दिले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------------------
या मैदानावर प्रकल्पग्रस्तांची मूले क्रिकेट खेळतात. या मैदानाचा गैरवापर होत नाही. खेळण्यासाठी कोणाकडूनही पैसे आकारले जात नाही.
प्रदीप पाटील,अध्यक्ष, फोर्टी प्लस