मुंबईतील झाडांना सिमेंटचे कठडे मारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील झाडांना सिमेंटचे कठडे मारक
मुंबईतील झाडांना सिमेंटचे कठडे मारक

मुंबईतील झाडांना सिमेंटचे कठडे मारक

sakal_logo
By

मुंबईतील झाडांना सिमेंटचे कठडे मारक
पालिकेची कार्यवाही मंदावल्याने धोका वाढला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईतील रस्ते, पदपथ आणि वसाहतींच्या बाजूला असणाऱ्या झाडांना  सिमेंटचे कठडे मारक ठरत आहेत. ते काढून टाकण्याचे आदेश हरित लवादाने दिले होते; मात्र साडेसहा वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी वेगाने झालेली नाही. पालिकेतर्फे आतापर्यंत ४० टक्केच कठडे काढण्यात आले आहेत. सुरुवातीचा वेग आता कमी झाला आहे. त्यामुळे सिमेंटचे कठडे झाडांसाठी धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत रस्ते बांधकामात अनेक ठिकाणी झाडांच्या मुळापर्यंत काँक्रीटीकरण करण्यात आले आहेत. मुंबईच्या विविध भागांत व्यापारी व दुकानदारांनी दुकानांबाहेरच्या पदपथावरील झाडांना सिमेंटचे कठडे बांधले आहेत. परिणामी मुळापर्यंत पाणी मिळत नसल्याने झाडे सुकून कोसळण्याची शक्यता अधिक असते. झाडांना मारक ठरणारे सिमेंटचे कठडे तत्काळ काढून टाकावेत, असे आदेश हरित लवादाने २७ मे २०१५ रोजी पालिकेला दिले होते. त्यानंतर पालिकेने अशा झाडांचे सर्वेक्षण करून कठडे काढण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला वेगाने काम करून माटुंगा, दादर, सायन-पनवेल महामार्ग आणि कुलाबा परिसरातील झाडांचे कठडे पालिकेने काढून टाकले. सुमारे सहा लाख झाडांना सिमेंटचे कठडे असल्याचे आढळले होते. त्यातील आतापर्यंत ४० टक्केच कठडे काढण्यात आले आहेत.

अजूनही अनेक झाडांचे कठडे कायम असल्याचे चित्र आहे. वनशक्ती संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे सहा लाख झाडांभोवती कठडे बांधण्यात आले आहेत. प्रशासनाने ते काढण्यास सुरुवात केली असली, तरी आजही निम्म्याहनू अधिक कायम आहेत. पालिका तक्रारी आल्यावरच त्याकडे लक्ष देऊन कामाला लागते. स्थानिक नागरिकांनीही कठडे काढण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करायला हवा, असे पर्यावरण संस्थांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

कठडे काढल्यास झाडे भक्कम
सिमेंट कठड्यांमुळे झाडे सुकत असल्याने पावसाळ्यात ते पडण्याचे प्रमाण अधिक असते. खबरदारीचा उपाय म्हणून पालिका निगा राखण्याऐवजी अशी झाडे तोडून टाकण्यावर भर देते. झाडे तोडण्याऐवजी कठडे काढून टाकल्यास ती भक्कम उभी राहतील, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.