भारतीय संविधानाचा प्रवास संथगतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय संविधानाचा प्रवास संथगतीने
भारतीय संविधानाचा प्रवास संथगतीने

भारतीय संविधानाचा प्रवास संथगतीने

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : संविधानाने नवीन मांडणी करण्यास सांगितले असतानाही, राज्यकर्ते त्यासाठी तयार होत नाहीत. संविधानाचा प्रवास संथगतीने चालावा, यासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक या स्वरूपाचे वेगवेगळे प्रवाह अनेक वर्षांपासून काम करत आहेत. हा प्रवाह माणसाला परिस्थितीतून बाहेरच पडू देतच नाहीत. अशा व्यवस्थेमुळेच संविधान यशस्वी होत नसल्याचे परखड मत संविधानतज्‍ज्ञ ॲड. सुरेश माने यांनी वाशीमध्ये व्यक्त केले.

संविधान फाऊंडेशन नागपूरच्या मुंबई विभागाच्यावतीने बुधवारी (ता. २३) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात भारतीय संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुरेश माने बोलत होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. माने म्हणाले, अमेरिकेची राज्यघटना ज्या फिला डेल्फीया येथे तयार केली, तेथे संविधान अधिवेशन केंद्र उभारले आहे. त्या ठिकाणी अमेरिकेची राज्यघटना कशी बनली, त्याचा आतापर्यंतच्या प्रवासाचे थेट सादरीकरण केले जाते. अशा पद्धतीची कुठलीही व्यवस्था भारतामध्ये नाही. अशा प्रकारचे संविधान अधिवेशन केंद्र भारताच्या चार कोपर्‍यांमध्ये उभारल्यास नागरिकांना संविधान समजून घ्यायला सोपे होईल. मात्र, याबाबतीत कुणीही गंभीर पाऊल उचलत नसल्याची खंत यावेळी माने यांनी व्यक्त केली.
संविधानाच्या निर्मितीवेळी १४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासंदर्भातील ४५ हे कलम होते. ते कलम आता काढण्यात आले. त्यानुसार जर प्रत्येक मुला-मुलींना सक्तीने व मोफत शिक्षण दिले असते, तर आज भारताचे चित्र वेगळे असते. भारतीय संविधानामुळे ज्यांची पिढीजात सत्ता गेली, ज्यांची राजेशाही गेली; तसेच सगळ्या स्तरातील सत्ता गेली, तो वर्ग नाराज असून संविधानविरोधी आहे. त्यामुळे तो वर्ग संविधानाकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याचे यावेळी माने यांनी स्पष्ट केले.
यावेळी जीएसटी विभागाचे मुंबई विभागीय सहायक आयुक्त पुष्पराज दहिवले, मुंबई उच्च न्यायालयाचे अभिवक्ता ॲड. पल्लवी राजपक्षे, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक राहुल गडपाले, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ व इतर मान्यवर उपस्थित होते.

संविधान जनजागृतीचे कार्यक्रम आवश्‍यक
देशात पहिल्यांदा २००५ मध्ये नागपूर जिल्‍ह्यातून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनाला सुरुवात करण्यात आले. संविधान रॅलीही पहिल्यांदा नागपूरमध्येच काढली. संविधान जागर करण्यामागचा उद्देश आपल्या हक्काबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. संविधान हा फक्त २६ नोव्हेंबर दिवसापुरता मर्यादित न करता, तो दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे संविधान जनजागृतीचे कार्यक्रम सतत राबवणे आवश्यक आहे, असे मत नागपूरमधील संविधान फाऊंडेशनचे माजी आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

घरोघरी संविधान
हर घर तिरंगा या उपक्रमामुळे शासकीय यंत्रणेने घरोघरी तिरंगा वाटण्याचे काम केले. त्यामुळे राष्ट्रध्वज काय असतो, याची देशभर चर्चा झाली. त्याच पद्धतीने सरकारने घरोघरी संविधान हा उपक्रमही २०२३ ते २०२५ या कालावधीत राबवावा, अशी सूचना ई. झेड. खोब्रागडे यांनी यावेळी केली.

नवी मुंबई : वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियानात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.