उल्हासनगर स्कायवॉकवर बंदोबस्ताची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगर स्कायवॉकवर बंदोबस्ताची मागणी
उल्हासनगर स्कायवॉकवर बंदोबस्ताची मागणी

उल्हासनगर स्कायवॉकवर बंदोबस्ताची मागणी

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः उल्हासनगर येथील स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कदम यांनी स्कायवॉकची पाहणी केली. येथील छायाचित्र घेऊन ते संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले. तसेच, गर्दुल्ल्यांच्या कब्जातून स्कायवॉक सोडवण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बारा-तेरा वर्षांपूर्वी एमएमआरडीएने ३४ कोटींच्या निधीतून उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला स्कायवॉक बांधला होता. या स्कायवॉकवर पुढे गर्दुल्ले, असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला. खून, मारामाऱ्या, पोलिसांवर हल्ला, लुटमार अशा घटना घडू लागल्या. ‘एक हात मदतीचा’ या संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी याबाबत २०१७ मध्ये पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांना निवेदन दिल्यावर गोयल यांनी सहा महिने स्कायवॉकवर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर गोयल यांची बदली झाल्यावर जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे स्कायवॉकचे पत्रे चोरी होऊ लागले आहेत. लाईट किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पायऱ्यांवरील लाद्या निखळल्या असून काही गायब झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या एटीएम मशीनला लागलेल्या आगीत स्कायवॉकवरील प्लास्टिकचे पत्रे वितळून गेले होते. ते चित्र अनेक वर्षांपासून तसेच दिसत आहेत. याशिवाय पत्रे घसरण्याच्या स्थितीत असून ते कोसळले तर प्रवासी, रिक्षाचालक यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. यासंदर्भात विजय कदम यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यांना निवेदन पाठवले असून त्यात स्कायवॉकची भयंकर दुरवस्था नमूद केली आहे. यावर तात्काळ उपाययोजना करून लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची विनंती केली आहे.