मालमत्ताधारकांनी याचिकेचा भाग व्हावे ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ताधारकांनी याचिकेचा भाग व्हावे !
मालमत्ताधारकांनी याचिकेचा भाग व्हावे !

मालमत्ताधारकांनी याचिकेचा भाग व्हावे !

sakal_logo
By

खारघर, ता. २४ (बातमीदार) : पनवेल महापालिकेकडून आकारण्यात आलेल्या दुहेरी मालमत्ता कराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेचा भाग होण्यासाठी प्रत्येक सदनिकाधारकाला न्यायालयीन शुल्क भरावा लागेल, अशी सूचना केली आहे. या निर्णयामुळे दुहेरी मालमत्ता कराच्या विरोधातील लढ्याला अधिक पाठबळ मिळणार आहे.
२०१६ पासून सिडको वसाहतीमधील मालमत्ताधारकांना पनवेल महापालिकेने लावलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात माजी कॅप्टन कलावत यांच्या हौसिंग फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी (ता.२३) सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी फेडरेशनच्यावतीने अॅड. सीपी जोशी यांनी युक्तिवाद करताना सर्व सभासद संस्थांच्या आर्थिक हिताच्या बाबी हाती घेणे ही सर्वोच्च संस्था म्हणून फेडरेशनचे कर्तव्य असल्याचे सांगितले. त्यावर न्यायमूर्ती गंगापूरवाला यांनी प्रत्येक घर मालकाने कोर्ट फी भरली आहे का, अशी विचारणा केली. तसेच सदनिकाधारकांना याचिकेचा भाग व्हायचे असेल प्रत्येकाला न्यायालयीन शुल्क भरावा लागेल, अशी सूचना केली आहे. या निर्णयाचे सदनिकाधारकांनी देखील स्वागत केले आहे.
---------------------------------
फेडरेशनमध्ये २७७ सोसायटी आहेत. न्यायालयीन शुल्क २५० रुपये आहे. आम्ही हे शुल्क भरण्यास तयार आहोत. पुढील सुनावणी १९ डिसेंबरला आहे. त्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
- कॅप्टन सी. एस. कलावत, याचिकाकर्ता