मेट्रोच्या कामामुळे नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोच्या कामामुळे नागरिक त्रस्त
मेट्रोच्या कामामुळे नागरिक त्रस्त

मेट्रोच्या कामामुळे नागरिक त्रस्त

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २४ (बातमीदार) ः मानखुर्दमध्ये सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच अनेकदा जलवाहिनी फुटून त्यात सांडपाणी मिसळत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्यात यावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक शाखाप्रमुख किसन टिकेकर यांनी दिला आहे.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरलगत मेट्रो रेल्वेच्या कारशेडचे काम सुरू आहे. अवजड वाहने या कामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करत असतात. त्यामुळे शीव–पनवेल महामार्गावरून महाराष्ट्र नगरकडे जाण्यासाठी असलेला रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग तसेच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी फुटून त्यामध्ये गटाराचे सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना केलेली नसल्‍यामुळे खोदकामातील राडारोडा व चिखल रस्त्यावर पसरत आहे. त्‍यामुळे वाहनांना येथून ये–जा करणे कठीण होत आहे. वास्‍तविक अवजड वाहनांना येथे बंदी असताना मेट्रोच्‍या कामासाठी ही वाहने या रस्त्यावरून जात असल्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. तसेच या वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

स्‍वच्‍छतागृह पाडल्‍याने गैरसोय
मेट्रोच्या कामात अडसर ठरणारे स्‍वच्‍छतागृह पाडण्यात आले आहे. त्याची पर्यायी व्‍यवस्‍था नसल्‍याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पालिकेने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांना होत असलेल्‍या त्रासाबद्दल प्रशासन व कंत्राटदारांना वारंवार सांगूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व समस्यांसंदर्भात ट्रॉम्बे पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे. लवकरत लवकर यावर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करू.
– किसन टिकेकर, शिवसेना शाखप्रमुख