मतदारांसमोर नेत्यांचा पिंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदारांसमोर नेत्यांचा पिंगा
मतदारांसमोर नेत्यांचा पिंगा

मतदारांसमोर नेत्यांचा पिंगा

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २४ (वार्ताहर)ः पनवेल तालुक्यातील १० गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ डिसेंबरला या निवडणुका होणार असल्याने आतापासूनच ग्रामीण भागात गावबैठकांमधून रणनीती आखली जात आहे. यंदा जनतेतूनच थेट सरपंच निवडला जाणार असल्यामुळे दिग्गजांचा मोठा कस लागणार असून आजतागायत गावात, वॉर्डातही न फिरकणारे नेते, पदाधिकारी गल्लीबोळातील मतदारांसोबत संवाद साधत आहेत.
पनवेल तालुक्यातील शिवकर, नितळस, भाताण, कानपोली, चिंध्रण, दिघाटी, करंजाडे, शिरढोण, केळवणे व नेरे या दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. २ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. अशातच राजकारणाचा पाया म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जात असल्यामुळे स्थानिक ग्रामपंचायतींमधून राजकारणाची सुरुवात करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांकडून आता थेट सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आघाडीवर असून ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांच्या चाचपणीसह मतदारांच्या भेटीगाठींना वेग आला आहे; तर इच्छुक उमेदवारांची नावे सोशल मीडियावर फिरत असून कधी गावात, वॉर्डात न भेटणारे नेते, पदाधिकारी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देत आहेत.
-----------------------------------
भावकीवर उमेदवारांचे भवितव्य
ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष न पाहता, ज्यांची गावात भावकी, गट मोठा आहे. अशा व्यक्तींना महत्त्व प्राप्त झाले आहे. माणसांचे चारित्र्य, आर्थिक परिस्थिती, समाजात पत आपल्या अडी-अडचणीत कोण कामाला येतात, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असते.
---------------------------------
सरपंचपदाला अधिक महत्त्व
शासनाकडून ग्रामविकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. अनेकांनी या निधीच्या माध्यमातून गावांचा चेहरामोहरा बदलला असल्याचे दिसून येते. हा निधी ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या खात्यावर येत असल्यामुळे गाव विकासाला मोठी चालना मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरपंच पदाला महत्त्व आहे.
----------------------------------------------
युवा वर्ग आघाडीवर
ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सरपंच पदाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक तरुणांना सरपंच पद खुणावत आहे. त्यामुळे गावातील विविध वॉर्डांत भेटीगाठी घेत मतदारांचा कल जाणून घेतला जात आहे. अनेकांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
--------------------------------------
‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला बिघडणार
गावगाड्याचा प्रमुख होण्याचा बहुमान मिळवण्यासाठी पक्ष प्रमुखांनी निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे गावची खुर्ची टिकविण्यासाठी उमेदवाराला अडीच-अडीच वर्षांसाठी सरपंचपद देण्याची बोलणी करावी लागत होती. यात माझ्या पॅनेलचा सरपंच, नंतर तुझ्या पॅनेलचा सरपंच असे वाद होत होते. मात्र, आता जनतेतूनच थेट सरपंच पदाची निवड होणार असल्याने या फॉर्म्युलाला गाव पातळीवरील मुकावे लागणार आहे.