पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त
पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त

पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त

sakal_logo
By

पालघर, ता. २४ (बातमीदार) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नव्याने उभ्या राहत असलेल्या बांधकाम भवनांच्या परिसरात व ढवळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराशेजारी रस्त्याच्या दर्शनी असलेले बेकायदा व्यावसायिक अतिक्रमण बांधकाम अखेर हटवण्यात आले आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करून जेसीबीच्या साह्याने सर्व बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले.
पालघर-बोईसर मार्गावर ढवळे रुग्णालयाच्या शेजारी बांधकाम विभागाची शासकीय जागा आहे. या शासकीय जागेवर गेल्या काही महिन्यांपासून एक बेकायदा अतिक्रमण बांधकाम उभे करण्यात आले होते. त्या ठिकाणी व्यवसायही सुरू होता. तसेच मागच्या बाजूला रहिवास दाखवून त्याला संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात होते. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाने या अतिक्रमणधारकांना नोटिशी बजावल्यानंतरही बांधकामधारक हे अतिक्रमण हटवत नव्हते.


शेवटी बेकायदा अतिक्रमण बांधकाम केलेल्यांनी हे अतिक्रमण हटवू नये यासाठी न्यायालयात स्थगितीसाठी दाद मागितली. मात्र बेकायदा अतिक्रमण असल्याने न्यायालयाने त्यांची स्थगिती मागणी फेटाळून लावली व अतिक्रमण काढण्याचा मार्ग मोकळा झाला. पावसाळा असल्याने हे अतिक्रमण काढता येत नव्हते. आता पावसाळा गेल्यानंतर अतिक्रमण हटवण्याची नोटीस देण्यात आली. मात्र ते न हटवल्याने पोलिस बंदोबस्तात ते जमीनदोस्त करण्यात आले.

..................................
अतिक्रमणामुळे रस्ता रुंदीकरण रखडले
दरम्यान, याच रस्त्यावर एसटी विभागाच्या तांत्रिक कार्यशाळेजवळ अतिक्रमण करून व्यवसायिक गाळे उभारण्यात आले आहेत. खानावळ, झेरॉक्स इत्यादी दुकाने थाटली आहेत. या व्यावसायिक गाळ्यांमुळे पालघर-बोईसर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम थांबले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अतिक्रमण दूर करावे व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करावे, अशी पालघरमधील लोकांची मागणी आहे.