बाजार करवसूलीत ठेकेदाराची मनमानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार करवसूलीत ठेकेदाराची मनमानी
बाजार करवसूलीत ठेकेदाराची मनमानी

बाजार करवसूलीत ठेकेदाराची मनमानी

sakal_logo
By

मनोर, ता. २४ (बातमीदार) : बोईसरलगतच्या सालवड ग्रामपंचायतीच्या बाजार करवसूली करणाऱ्या ठेकेदाराकडून ग्रामपंचायत हद्दीतील टपरीचालक आणि फेरीवाल्यांची बाजार कराच्या रकमेपेक्षा अधिकची वसुली केली जात आहे. ग्रामपंचायतीने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करून लूटमार केली जात असल्याची ओरड होत आहे. ठेकेदाराकडून दररोज वीस रुपयांची पावती देऊन तीस रुपयांची जबरदस्तीने वसूली केली जात असल्याचा आरोप टपरीचालक आणि फेरीवाल्यांनी केला आहे.
सालवड ग्रामपंचायत हद्दीत तारापूर औद्योगिक वसाहतीचा भाग समाविष्ट आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालेल्या चित्रालय आणि शिवाजी नगर भागातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दुकाने, टपऱ्या आणि फेरीवाले व्यवसाय करतात. सालवड ग्रामपंचायतीकडून चालू वर्षाकरीता एका ठेकेदाराला लिलाव प्रक्रियेद्वारे दुकाने, टपरी आणि फेरीवाल्यांकडून दैनदिन बाजार करवसुलीसाठी साडे आठ लाख रुपये रक्कम आकारून वार्षिक ठेका देण्यात आला आहे.
सालवड ग्रामपंचायतीकडून प्रती दुकानदार, टपरीचालक आणि फेरीवाल्यांकडून दररोज वीस रुपये बाजारकर निश्चित करण्यात आला होता. ठेकेदाराच्या बाजार करवसूली करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून २० रुपयाऐवजी बेकायदेशीरपणे ३० रुपयांची वसूली केली जात असल्याची तक्रार फेरीवाल्यांनी केली आहे. याबाबत फेरीवाल्यांनी वसूली करणाऱ्या माणसांना जाब विचारला असता तुमची दुकाने आणि टपऱ्या मोठ्या असल्याकारणाने अधिकची रक्कम आकारत असल्याचे सांगितले.

........................
वसुली ३० रुपयांची, पावती मात्र २० रुपयांची
दुकानदारांनी ३० रुपये रकमेच्या पावतीची मागणी केल्यावर ठेकेदारकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप चित्रालय परीसरातील फेरीवाल्यांनी केला आहे. ठेकेदारामार्फत फेरीवाल्यांची होत असलेली लूट थांबवून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जात आहे.

ठेकेदाराचे हित जोपासत असल्याचा आरोप
बोईसर आणि परीसरातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवर हजारो फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. शुक्रवारी आठवडा बाजाराच्या दिवशी फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होते. फेरीवाल्यांकडून कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीमार्फत दरवर्षी लिलावाद्वारे बाजारकर ठेका दिला जातो; मात्र वार्षिक ठेका देताना लिलाव प्रक्रीयेमध्ये फेरीवाल्यांची संख्या मुद्दामहून कमी दाखवून वार्षिक बाजारकर वसूली ठेका दिला जाऊन ठेकेदारांचे हित जोपासले जात असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून केला जात आहे.

..................
ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या बाजार कराच्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम वसूल केली जात असल्याचे आढळल्यास ठेकेदारावर नियमानुसार कारवाई केली जाईल. तसेच ग्रामपंचायतीने निश्चित केलेला बाजार कराच्या दराचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, पालघर.