गावदेवी मैदानाचा चेहरा मोहरा बदलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावदेवी मैदानाचा चेहरा मोहरा बदलला
गावदेवी मैदानाचा चेहरा मोहरा बदलला

गावदेवी मैदानाचा चेहरा मोहरा बदलला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : पालिकेच्या माध्यमातून गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्यात आले आहे. या वाहनतळामुळे रस्त्यावर बेकायदा उभ्या राहणाऱ्या व वाहतूक कोंडीस अडथळा निर्माण होणारी समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. मात्र, या भूमिगत वाहनतळामुळे गावदेवी मैदानाचा चेहरा-मोहरा बदलला असल्याचे दिसून येत आहे. या मैदानात पथदिवे, विद्युत दिवे, संरक्षक भिंत अशा सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. शौचालय आणि संरक्षक भिंतीच्या उभारणीमुळे रात्रीच्या वेळेस मैदानात लघुशंका करण्याच्या प्रकारांना आळा बसणार असून मैदान संरक्षित होण्यास मदत होणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

गावदेवी मैदानात स्मार्ट सिटी अंतर्गत भूमिगत वाहनतळ उभारले आहे. गावदेवी मैदानाची व्याप्ती ५६९० चौरस मीटर एवढी आहे. त्यापैकी ४३१० चौ. मी जागेवर वाहनतळाचे बांधकाम केले आहे. या मैदानात १३० चारचाकी आणि १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा आहे. जानेवारी २०१९ मध्ये काम सुरू झालेल्या या प्रकल्पाचा खर्च सुमारे ३० कोटी इतका आहे. दोन वर्षांत पूर्ण होणारा हा प्रकल्प कोरोना काळामुळे तब्बल चार वर्षे लांबल्याने ठाणेकर हक्काच्या मैदानापासून वंचित राहिले आहेत. सुरुवातीला या प्रकल्पाला विरोध झाला होता. हा वाद न्यायालयापर्यंत गेला होता; परंतु पालिकेने प्रकल्पाचे महत्त्‍व न्यायालयात सांगून त्यास न्यायालयाची परवानगी मिळविली होती.
मैदानाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा कमी?
प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले असून, या प्रकल्पाचे लोकार्पण लवकरच होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा वाद अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे. भूमिगत वाहनतळावरील मैदान पूर्ववत केल्याशिवाय वाहनतळाचे लोकार्पण करू देणार नसल्याचा इशारा भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यापाठोपाठ वाहनतळाची निर्मिती करताना मैदानाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा कमी झाल्याच्या मुद्द्यावरून ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी एकमत व्यक्त केले होते.
...............................................
मैदानाचे क्षेत्रफळ घटले
गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्यात आल्यामुळे मैदानाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा कमी झाल्याची टीका सामाजिक संघटनांकडून करण्यात येत होती. मात्र, टीका होऊ लागताच पालिका प्रशासनाने त्यावर स्पष्टीकरण देत, गावदेवी मैदानाचे पूर्वीचे क्षेत्रफळ ५९८२ चौरस मीटर इतके होते. वाहनतळाच्या उभारणीनंतर मैदानाचे क्षेत्रफळ ५५३४ चौरस मीटर इतके झाले असून, यामुळे मैदानाचे क्षेत्रफळ केवळ ४४८ चौरस मीटर इतकेच कमी झाले असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

--