तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का?
तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का?

तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का?

sakal_logo
By

किन्हवली, ता. २४ (बातमीदार) : तीन वर्षांनंतर होऊ घातलेली पोलिस भरती राज्य शासनाने पुढे ढकलली. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण, तरुणींमध्ये निराशा पसरली आहे. असेच सुरू राहिल्यास आम्ही आयुष्यभर पोलिस भरतीची तयारी करायची काय, असा संतप्त सवाल पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी विचारत आहेत.

पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण मागील काही वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहेत; परंतु तीन वर्षांपासून भरती झालीच नाही. वीस हजार पोलिस पदांच्या भरतीविषयीची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी द्यावी, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून असतानाही या आदेशाला चोवीस तास उलटण्यापूर्वीच स्थगिती देण्यात आली. त्यामुळे तयारी करणाऱ्या युवकांमध्ये संतापासह संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवकांमध्ये पोलिस बनण्याचे स्वप्न आहे. हे पूर्ण करण्यासाठी ते कठोर परिश्रम घेत आहेत. शारीरिक क्षमता चाचणी व पेपरचा अभ्यास करीत आहेत. भल्या पहाटे थंडी-वाऱ्यात कसरत करत आहेत. पण भरतीच निघत नसल्याने काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वय वाढत चालले आहे; परंतु सरकार भरती प्रक्रिया राबवत नाही. आम्ही आमचे तरुणपण काय पोलिस भरतीच्या तयारीतच घालवायचे का, असा संतप्त सवाल तरुण विचारत आहेत.
------------
पोलिस होण्यासाठी दोन वर्षांपासून अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. किन्हवली येथे भाड्याच्या खोलीत राहून भरतीची तयारी करीत आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना आई-वडील मोलमजुरी करून पैसे पुरवतात. शासन केवळ भरतीची घोषणा करून आमच्या भावनेशी खेळते आहे.
- मयुरेश पाटील, नेरळ, जि. रायगड.
---
पोलिस भरतीच्या आशेने मुले-मुली अत्यंत मेहनत घेत आहेत. सतत वाचन, मैदानी सराव, व्यायाम करत आहेत; पण सातत्याने भरतीची तारीख पुढे ढकलत असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे.
- सुनील केदार, प्रशिक्षक, संघर्ष पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, किन्हवली.