वाडा परिसरात बिबट्याचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाडा परिसरात बिबट्याचा वावर
वाडा परिसरात बिबट्याचा वावर

वाडा परिसरात बिबट्याचा वावर

sakal_logo
By

वाडा, ता. २४ (बातमीदार) ः वाडा शहरापासून अंदाजे अर्धा किमीच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. आपले भक्ष्य शोधण्यासाठी तो वर्दळ कमी झाल्यानंतर दुपारी, संध्याकाळी व पहाटे बाहेर पडतो, असे निदर्शनास आले आहे. तो कुत्री, कोंबड्या, बकऱ्या अथवा लहान मुले आणि भुकेल्या वा पिसाळलेल्या अवस्थेत मोठ्या माणसांनाही लक्ष्य करू शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना सतर्क राहा आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
वनविभागाने नागरिकांना कळवले आहे की, शक्यतो संध्याकाळी गावाबाहेर पायी फिरायला जाणे टाळा, पहाटे अंधार असताना फिरायला जाणे टाळा, लहान मुलांना शक्यतो घराबाहेर एकटे सोडू नका, रात्री घराबाहेर गप्पा मारत बसू नका. रस्त्यावर शेकोटी पेटवून उशिरापर्यंत शेकत बसू नका, रात्री अथवा पहाटे नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जाऊ नका. खरोखरच बिबट्या दिसल्यास आरडाओरडा न करता शांत राहून तेथून काढता पाय घ्यावा, शक्य असल्यास बिबट्याचा फोटो काढून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा समाजातील जबाबदार व्यक्तींना तत्काळ कळवावे, म्हणजे तो कोणत्या भागात आहे हे लक्षात येईल. शक्य असल्यास फटाके वाजवून त्याला गावाबाहेर पळवण्याचा प्रयत्न करावा. वनविभागाचे पथक शोध कार्य करत असताना गर्दी करून त्यांच्या कामात अडथळा आणू नये. गरज भासल्यास आवश्यक तेवढी मदत करावी, अधिकृत माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे सोशल मीडियावर चुकीचे मेसेज अथवा व्हिडीओ व्हायरल करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.
...
शर्थीचे प्रयत्न सुरू
गेले पाच सहा दिवस वनविभागाचे अधिकारी व बचाव पथक बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. रात्रीच्या सुमारास पिंजरे लावण्यात येत आहेत. अजूनपर्यंत बिबट्याने कोणतीही हानी पोहोचवलेली नाही, असे वाडा पश्चिमचे परिक्षेत्र वनअधिकारी विकास लेंडे यांनी सांगितले.