मराठी गाणी वाजवण्यास नकार हॉटेल चालकाला मनसैनिकांचा चोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी गाणी वाजवण्यास नकार 
हॉटेल चालकाला मनसैनिकांचा चोप
मराठी गाणी वाजवण्यास नकार हॉटेल चालकाला मनसैनिकांचा चोप

मराठी गाणी वाजवण्यास नकार हॉटेल चालकाला मनसैनिकांचा चोप

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : मराठी गाणी वाजवण्यास नकार देणाऱ्या हॉटेल चालकास मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात एपीएमसी पोलिसांनी अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे. या घटनेनंतर हॉटेल मालकाने पत्रक काढत या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

वाशीतील द ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीने बुधवारी (ता. २३) पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी सदर हॉटेलमध्ये हिंदीसह इतर भाषांतील गाणी वाजवण्यात येत होती. कंपनीच्या कर्मचारी, तसेच पार्टीचे आयोजन करणाऱ्या प्रतिनिधींनी हॉटेलमधील डिजे चालकाला मराठी गाणे लावण्यास सांगितले. मात्र व्यवस्थापक व डिजेने हॉटेलमध्ये मराठी गाण्यास बंदी असल्याचे सांगत नकार दिला. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर मनसैनिक हॉटेलमध्ये पोहोचले.

मनसैनिकांनी हॉटेलमधील व्यवस्थापकाला मराठी गाणी लावण्याबाबत विचारणा केली असता, मुजोरपणा दाखवत मराठी गाणी लावण्यात येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी हॉटेल व्यवस्थापकाला चोप दिला. या घटनेनंतर एकच गोंधळ झाला असून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मनसेचा इशारा
मराठी गाणी महाराष्ट्रात वाजवलीच पाहिजेत, नाहीतर मनसेचा आवाज निश्चित निघणार, असा धमकीवजा इशारा मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे. हॉटेलचे संचालक प्रदीप शिंदे यांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे पत्रकातून म्हटले आहे.