एसटी कर्मचाऱ्यांना भत्त्यातील फरक नाहीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांना भत्त्यातील फरक नाहीच
एसटी कर्मचाऱ्यांना भत्त्यातील फरक नाहीच

एसटी कर्मचाऱ्यांना भत्त्यातील फरक नाहीच

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. मात्र, ज्यावेळी राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला तेव्हा एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांना त्याचा फायदा मिळाला नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर एसटी प्रशासनाने त्यासंबंधित परिपत्रक काढले आहे. मात्र, त्यामध्ये मागील फरकाचा उल्लेख नसल्याने एसटी कर्मचारी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता जाहीर झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अजून २८ टक्के इतकाच भत्ता मिळतो. यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता लागू असताना, एसटीत सुद्धा ३४ टक्के महागाई भत्ता करण्याच्या मागणीची फाईल सरकार दरबारी मंजुरीसाठी धूळ खात पडली होती. अखेर संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली. मात्र, नव्याने घोषित झालेला महागाई भत्ता देताना मागील फरकाची रक्कम मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी (ता.२५) एसटी महामंडळाने महागाई भत्त्याच्या संदर्भातील परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये मागील फरकासंदर्भात कोणताही उल्लेख नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एसटी प्रशासन लबाड असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
----------
वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रकमेसाठी वंचित ठेवले जात आहे. महाविकास आघाडी सरकारने सुद्धा मध्यस्थी करून १२ टक्क्यांवरून २८ टक्के महागाई भत्ता दिला. मात्र, त्याच्या २०१६ पासूनच्या फरकाची रक्कम दिली नाही. सरकार कोणतेही असले तरी वारंवार कर्मचाऱ्यांची फसवणूक केली जात आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस