‘दृश्यम२’मुळे आशा पल्लवीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दृश्यम२’मुळे आशा पल्लवीत
‘दृश्यम२’मुळे आशा पल्लवीत

‘दृश्यम२’मुळे आशा पल्लवीत

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २५ ः गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. आरआरआर, केजीएफ २, कांतारा यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांना भरभरून गर्दी करणारे प्रेक्षक हिंदी सिनेमा बघण्यास अनुत्सुक दिसत आहेत. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत निराशा पसरली आहे. पण ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाबरोबरच ‘उंचाई’ आणि ‘दृश्यम- २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ‘दृश्यम’ने आतापर्यंत शंभर कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा धुगधुगी जाणवू लागली आहे.

बाहुबली फेम एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बाराशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यानंतर आलेल्या दिग्दर्शक प्रशांत नीलच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ने चांगली कमाई केली होती. या चित्रपटानेही बाराशे कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला. त्यानंतरच्या ‘कार्तिकेय २’ ही प्रेक्षकांनी उत्तम पसंती दिली होती. त्यानंतर दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटानेही आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. आताही हा चित्रपट विविध चित्रपटगृहांत सुरू आहे. याच दरम्यान प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांना फारसे प्रेक्षकच येत नसल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत काहीसे चिंतेचे वातावरण पसरले होते. प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांना अधिक पसंती देत असल्यामुळे हिंदीतील निर्मात्या व दिग्दर्शकांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

मात्र, दिग्दर्शक अभिषेक पाठकच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्यामुळे आता चिंतेचे सावट दूर झाले आहे. ‘दृश्यम’ने आतापर्यंत १०४.६६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट आताही चित्रपटगृहात सुरू असल्यामुळे तो आणखीन कमाई करील असे बोलले जात आहे.
------------
‘दृश्यम- २’ हा चित्रपट यशस्वी झाला त्याबद्दल अजयचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन! सगळ्यांनी उत्तम काम केले आहे आणि त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. प्रेक्षकांचे खूप खूप आभार. कौटुंबिक चित्रपटांना प्रेक्षक पसंती देत आहेत. आता माझा ‘सलाम वेंकी’ हा चित्रपट येत आहे. एका आईची आणि मुलाची ही भावनिक कहाणी आहे.
- काजल, अभिनेत्री
-----------
कोरोनानंतर काहीसे संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते; परंतु आता प्रेक्षक चित्रपटगृहांत चित्रपट पाहायला येत आहेत. ही आनंदाची बातमी आहे.
- तुषार कपूर, अभिनेता
------
‘दृश्यम’ला चांगले यश मिळालेले आहे ही गोष्ट खरी असली तरी आगामी चित्रपट किती व्यवसाय करतात याकडेही आता लक्ष देणे आवश्यक आहे. रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा चित्रपट येत आहे आणि तो मोठा चित्रपट आहे. तो चांगली कमाई करील असे वाटते. कारण आता हिंदी चित्रपटांना प्रेक्षक येत आहेत.
- तरण आदर्श, चित्रपट समीक्षक