४३० स्टॉलधारकांचा एसटीला रामराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४३० स्टॉलधारकांचा एसटीला रामराम
४३० स्टॉलधारकांचा एसटीला रामराम

४३० स्टॉलधारकांचा एसटीला रामराम

sakal_logo
By

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध एसटी बस स्थानकांवरील परवानाधारक खाद्यपदार्थ स्टॉलधारकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे परवाना शुल्कमाफी देण्याची मागणी स्टॉलधारकांनी केली होती, तसा प्रस्तावही महामंडळाकडून तयार करण्यात आला; मात्र त्यासंदर्भातील फाईल महामंडळाच्या अध्यक्षांकडे अनेक महिने पडून राहिल्याने सुमारे ४३० स्टॉलधारक सोडून गेले. परिणामी त्यातून मिळणारे भाडे थांबल्याने एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी विविध कारणांनी एक हजाराहून अधिक स्टॉल्स बंद पडले आहेत.
मुळातच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोना आणि कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका बसला. कोरोनापूर्वी एसटीतून दररोज ६५ ते ७० लाख प्रवासी प्रवास करत होते; मात्र आता ही संख्या २५ ते २८ लाखांवर आली आहे. त्यामुळे एसटीवर आधारित इतर पूरक व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. एसटीच्या राज्यभरातील आगारांमध्ये सुमारे ४ हजार २०० परवानाधारक स्टॉलधारक आहेत. त्यांच्याकडून महामंडळाला वार्षिक २४ कोटी रुपयांचा महसूल मिळतो; मात्र लॉकडाऊन आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस स्थानकांवर प्रवासी नसल्याने स्टॉलधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे परवाना शुल्कमाफीची मागणी स्टॉलधारकांनी केली.
एसटी महामंडळानेही परवाना शुल्कमाफीचा प्रस्ताव तयार करत तो मंजुरीसाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे पाठवला; मात्र जवळपास चार महिने हा प्रस्ताव मंजुरीविना पडून होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवाना शुल्कमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे; मात्र गेल्या चार महिन्यांत कोणताही निर्णय न झाल्याने सुमारे ४३० स्टॉल्सधारक सोडून गेले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचे नुकसान झाले आहे.
---
३२०० स्टॉलधारकांना फायदा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बस स्थानकांवरील स्टॉलधारकांचा परवाना शुल्कमाफीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार लॉकडाऊन काळात मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीसाठी १०० टक्के, एप्रिल ते जून २०२१ साठी ५० टक्के आणि नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या संप कालावधीत परवाना शुल्कात ७५ टक्के सवलत देण्याचे जाहीर केले. त्याचा लाभ सुमारे ३२०० परवानाधारक स्टॉलधारकांना होणार आहे.
........
स्टॉलधारकांच्या परवाना शुल्कमाफीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने स्टॉलधारक कमी झाले नाहीत. प्रवासी कमी झाल्याने स्टॉलधारक कमी झाले आहे. प्रवासी वाढल्यानंतर स्टॉलधारक वाढेल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ