वसई न्यायालयाच्या परिसरातून आरोपी फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई न्यायालयाच्या परिसरातून आरोपी फरार
वसई न्यायालयाच्या परिसरातून आरोपी फरार

वसई न्यायालयाच्या परिसरातून आरोपी फरार

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : विरारमधील आयसीआयसीआय बँकेतील दरोडा आणि हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिल दुबे आज (ता. २५) वसई न्यायालयाच्या परिसरातून एका मोटारसायकलवर बसून फरारी झाला. याबाबत वसई पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. लघुशंकेच्या बहाण्याने आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे आरोपी पळाल्याने आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहातून आज चार आरोपींना सुनावणीसाठी वसई न्यायालयात पोलिस घेऊन आले होते. यात आयसीआयसीआय बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे याचाही समावेश होता. दुपारी पावणेदोन वाजता वसईत आरोपींसह पोलिस न्यायालय परिसरात दाखल झाले. त्यांना २ वाजता न्यायालयात हजर केले; पण वकील नसल्यामुळे त्यांना पुढील तारीख देण्यात आली. वसई न्यायालयातून बाहेर घेऊन आल्यानंतर अनिल दुबे याने लघुशंकेला जाण्याचा बहाणा केला. त्यावेळी कर्तव्यावर असणारे सहायक पोलिस उपनिरीक्षक धुरी हे त्याला वसई पंचायत समितीच्या बाजूच्या सार्वजनिक शौचालयामध्ये घेऊन गेले. त्याचवेळी धुरी यांच्या हाताला झटका मारून अनिलने पळ काढला. याच शौचालयाच्या बाजूलाच त्याचा एक मित्र मोटारसायकल घेऊन उभा होता. त्याच दुचाकीवर बसून तो फरारी झाला. पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो त्यापूर्वीच फरारी झाला होता.

कोण आहे अनिल दुबे?
अनिल दुबे हा आयसीआयसीआय बँकेचा माजी व्यवस्थापक होता. तो शेअरमार्केटमध्ये कर्जबाजारी झाला असल्याने त्याने ३० जुलै २०२१ रोजी रात्री आठच्या सुमारास विरार पूर्वेतील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत दरोडा टाकून सहायक व्यवस्थापक आणि रोखपाल या दोन महिलांवर धारदार हत्याराने वार करत बँकेतील एक कोटी ३८ लाख रुपयांची रोख आणि सोने घेऊन फरारी होत होता. मुख्य रस्त्यावर गर्दी असल्यामुळे तो पळून जाण्यात अयशस्वी ठरल्याने त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.