राज्यात प्रभागनिहाय मतदारयाद्या करण्याची आयोगाची सुचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात प्रभागनिहाय मतदारयाद्या करण्याची आयोगाची सुचना
राज्यात प्रभागनिहाय मतदारयाद्या करण्याची आयोगाची सुचना

राज्यात प्रभागनिहाय मतदारयाद्या करण्याची आयोगाची सुचना

sakal_logo
By

कल्याण, ता. २८ (बातमीदार) ः कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राबरोबरच राज्यभरातील महापालिका क्षेत्रातील मतदारयादीतील दोष व त्रुटींबाबत पडताळणी करून मतदारांचे विभाग व पत्त्याबरोबरच प्रभागानुसार मतदारयादी तयार करावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयुक्तांनी दिल्या आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पत्रानंतर निवडणूक विभागाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यभरातील मतदारांना दिलासा मिळाला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये काही प्रभागांतील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागातील मतदारांची नावे तिसऱ्या प्रभागात गेली होती. त्यामुळे मतदारयादीत नाव असूनही शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची भीती होती. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत ७ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक घेतली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

........................
सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मतदारनोंदणी अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेतली. त्या वेळी निवडणूक आयोगाकडून मतदारयादीतील दोष व त्रुटींबाबत पडताळणी करून मतदारांचा सेक्शन, पत्ता यामध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रभागनिहाय मतदारयादी करण्याच्या सूचना दिल्या.