पोलीस कारवायांनी मोडली तस्करांची कंबर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस कारवायांनी मोडली तस्करांची कंबर...
पोलीस कारवायांनी मोडली तस्करांची कंबर...

पोलीस कारवायांनी मोडली तस्करांची कंबर...

sakal_logo
By

अमली पदार्थांची ‘नशा’ उतरली!
वाढत्या पोलिसी कारवायांमुळे तस्करांचे रॅकेट उद्ध्वस्त
केदार शिंत्रे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या काही महिन्यांपासून तस्करांविरोधात उघडलेल्या धडक मोहिमेचे यश दिसू लागले आहे. पथकाने कारवाईचा वेग वाढवल्याने अमली पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या कारवाया काही प्रमाणात थंडावल्या असून बाजारात अमली पदार्थांचे प्रमाणही कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मुंबईत अमली पदार्थाच्या काळ्या बाजारात ड्रग्ज मिळेनासे झाल्याने त्यांच्या किमती पाच पटीने वाढल्याचेही समजते.
पोलिसांच्या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करीला काही प्रमाणात खीळ बसला आहे. मुंबईत सध्या बरेचसे अमली पदार्थ उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. मेफेड्रोन म्हणजेच एमडी नामक अमली पदार्थ सध्या मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये उपलब्ध नसल्याची माहिती आहे. वाढत्या कारवायांमुळे सध्या अमली पदार्थ बाजारात फारसे येत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र, मागणी घटलेली नसल्याने अमली पदार्थांची किंमत पाच पटींनी वाढली आहे. एमडीची आतापर्यंतची मोठी जप्ती आणि भारतातील सर्वात मोठ्या पुरवठादाराला ऑगस्टमध्ये मुंबई गुन्हे शाखेने अटक केल्याने अमली पदार्थांच्या तस्करांचे कंबरडे मोडले आहे.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ऑगस्टमध्ये ४,८०० कोटींचे २,४०० किलो मेफेड्रोन जप्त करून आठ आरोपींना अटक करत एक ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त केले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुजरात आणि मुंबईतून १२० कोटींचे अंदाजे ६० किलो मेफेड्रोन जप्त केले. अशा मोठ्या जप्तीमुळे अमली पदार्थांच्या पुरवठा थंडावला आहे यात शंका नाही.

एमडी ३५०० रुपये प्रतिग्रॅम?
पथकाच्या कारवाईमळे सध्या मुंबईतील अमली पदार्थांचा बाजारात तुटवडा आहे; परंतु मागणी घटलेली नाही. परिणामी त्याच्या किमती वाढल्या आहेत. एक ग्रॅम एमडी अमली पदार्थ काही दिवसांपूर्वी ६०० ते ७०० रुपयांना विकले जात होते. ते आता ३००० ते ३५०० प्रतिग्रॅम विकले जात आहे. अलीकडेच पोलिसांनी ५० ग्रॅम एमडी जप्त करत एका व्यापाऱ्याला अटक केली. त्याच्या तपासात पोलिसांना आढळलेली माहिती धक्कादायक आहे. एमडी आता मुंबईत क्वचितच उपलब्ध असून ते ३००० ते ३५०० रुपये प्रतिग्रॅम दराने विकले जात असल्याचे तपासात आढळले.

मास्टरमाईंड अटकेत
मुंबई पोलिसांनी यंदाच्या वर्षी अमली पदार्थांच्या व्यापार आणि उत्पादनाशी संबंधित एका मोठ्या तस्कराला नुकतीच अटक केली. प्रेम प्रकाश सिंग असे आरोपीचे नाव असून तो ‘एमडी’चा सर्वात मोठा उत्पादक आणि पुरवठादार होता. शांतपणे कोणताही गाजावाजा न करता तो काम करत असल्यामुळे तपास यंत्रणांच्या रडारवर त्याचे नाव कधी आले नाही; पण मार्चमध्ये पोलिसांनी उकल केलेल्या एका छोट्याशा प्रकरणामुळे ते आरोपीपर्यंत पोहचले. पोलिसांना तपासात अमली पदार्थांच्या सिंडिकेटचा मास्टरमाईंड ५५ वर्षीय प्रेम प्रकाश सिंग असल्याचे आढळले. तो रसायनशास्त्रात पदव्युत्तर आणि वित्त विषयात एमबीए झाला होता.

तब्बल ४५०० किलोचे उत्पादन
आरोपी प्रेम प्रकाश सिंग २०१९ पासून ‘एमडी’च्या उत्पादनात असून २०१७ पासून तो त्यावर संशोधन करत आहे. त्याने २०१९ पासून यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये पकडले जाईपर्यंत ९,००० कोटी रुपयांचे सुमारे ४,५०० किलो एमडी अमली पदार्थ तयार केले होते. मुंबई पोलिसांच्या पथकाने अलीकडेच सिंग याची मुंबई आणि आसपासच्या भागात २० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ज्यात दुकाने आणि फ्लॅटचा समावेश आहे.

आमच्या पथकाने गेल्या काळात केलेल्या काही कारवायांत मोठे मिळाले आहे. प्रेम प्रकाश सिंग एमडी ड्रग्जची तस्करी उत्पादनाच्या सिंडिकेटचा मास्टरमाईंड आहे. त्याच्या अटकेनंतर एमडी अमली पदार्थाचे उत्पादन आणि तस्करीवर मोठ्या प्रमाणात घट झाली. बाजारात एमडीचा तुटवडा असल्याची माहिती असून पाचपट किंमत वाढल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
- दत्ता नलावडे, उपायुक्त, अमली पदार्थविरोधी पथक, मुंबई पोलिस

आतापर्यंतच्या मोठ्या कारवाया

- १३ ऑगस्ट ः मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी सेलच्या वरळी युनिटने गुजरात येथील अंकलेश्वरमध्ये एका छोटेखानी कारखान्यावर छापा टाकला आणि ५१३ किलो एमडी पदार्थ जप्त केले. कारखान्याच्या मालकाला अटक केली.
- ६ ऑक्टोबर ः न्हावा-शेवा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेला हिरवी सफरचंद असलेला कंटेनर रोखला. हिरव्या सफरचंदांच्या बॉक्समध्ये कोकेनच्या प्रत्येकी अंदाजे एक किलो वजनाच्या मोठ्या विटा लपवल्या गेल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान ५०.२३ किलो वजनाच्या आणि ५०२ कोटी रुपयांच्या एकूण ५० विटा जप्त करण्यात आल्या.
- ७ ऑक्टोबर ः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत मुंबई आणि गुजरातमधून १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ६० किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. कारवाईत एनसीबीने एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना अटक केली.
- अन्य एका कारवाईत पोलिसांनी १,०२६ कोटी रुपये किमतीचे ५०० किलोपेक्षा जास्त प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केले आहेत. एका महिलेसह एकूण सात आरोपींना अटक केली.

- ११ नोव्हेंबर ः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ३५ कोटी रुपयांच्या ४.९८ किलो हेरॉईनसह एका प्रवाशाला अटक केली. त्याच्याकडील एका ट्रॉली बॅगमध्ये ४.९८ किलो हेरॉईन आढळले.