कल्याण-डोंबिवलीकरांना ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण-डोंबिवलीकरांना ताप
कल्याण-डोंबिवलीकरांना ताप

कल्याण-डोंबिवलीकरांना ताप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : सातत्याने हवामानात होणाऱ्या बदलामुळे शहरात साथीचे आजार बळावले आहेत. साथीच्या तापाने तब्बल १५ हजार कल्याण-डोंबिवलीकर फणफणले असून मलेरिया, डेंगी या आजाराचे प्रमाण वाढत आहे. पावसाळा आणि हिवाळा या दरम्यान हवामानात सातत्याने बदल होत असल्याने साथीचे आजार बळावतात. जून ते नोव्हेंबर महिन्यांतील रुग्णांची आकडेवारी पाहता मागील वर्षी १० हजार नागरिकांना ताप चढला होता. यावर्षी रुग्णांची संख्याही १५ हजारांच्या घरात गेली आहे. डेंगी व मलेरियाचे अनुक्रमे ८२ व ८४ रुग्ण आढळून आले आहेत. साथीच्‍या आजाराबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असून, ज्या भागात डेंगी, मलेरिया सदृश रुग्ण सापडत आहेत त्या परिसरात सर्वेक्षणाचा वेग वाढविल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

शहर स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाच्या वतीने लक्ष दिले जात असले तरी ग्रामीण भाग, चाळ परिसरात ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. अनेक भागात चाळी तोडून तेथे मोठ्या इमारती उभारणीचे काम सुरू आहे. या ठिकाणी साचलेले पाणी, ओलावा यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. खासगी दवाखान्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. डेंगी, मलेरियाचे रुग्ण असल्यास खासगी डॉक्टरांनी त्याची माहिती पालिका रुग्णालयास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामानातील बदलामुळे तसेच घरात व घराबाहेर साचलेला कचरा, साठवलेले पाणी यामुळे हे आजार बळावत असून, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

केडीएमसीचा आरोग्य विभाग तत्पर
जून महिन्‍यापासून आत्तापर्यंत केडीएमसी हद्दीत डेंगीचे ८२ तर मलेरियाचे ८४ रुग्ण आढळून आले आहेत. ज्या परिसरात डेंगी व मलेरियाचे रुग्ण आढळून आलेले आहेत, तेथे प्रत्येक रुग्णाच्या घरी, परिसरात जाऊन तेथील नागरिकांची तपासणी, पाहणी केली जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पालिकेची १८ नागरी आरोग्य केंद्रे असून, यामधील कर्मचारी रुग्ण आढळलेल्‍या परिसरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. नागरिकांची तपासणी, पाणीसाठ्यात डास अळींची पाहणी केली जाते. तसे आढळून आल्यास पाणीसाठा व डास अळ्या नष्ट केल्या जातात. आत्तापर्यंत तीन हजार १२१ घरांचे सर्वेक्षण केले असून, त्यात १३ हजार १२० लोकांची माहिती घेण्‍यात आली आहे. जनजागृतीसाठी दोन हजार पत्रके वाटली आहेत. पथनाट्याद्वारे जनजागृती केली जात आहे.
-----------------------------------------
रस्त्यावर, परिसरात कचरा टाकला जातो. या कचऱ्यावर मलेरियाची डास उत्पत्ती होते. ते चावल्यास मलेरिया होतो. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासोबत परिसर स्वच्छतेला देखील प्राधान्य द्या; जेणेकरून डास होणार नाहीत व साथीच्या आजारांना देखील आळा बसेल.
-डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, केडीएमसी
-------------------------------------------------

महापालिका हद्दीतील रुग्णसंख्‍या
१ जून ते नोव्हेंबर २०२२
साथीचा ताप - १५ हजार २०२
टायफाईड- २६८
डेंगी- ८२
मलेरिया-८४
लेप्टो-५
स्वाईन फ्ल्यू-७८
कावीळ-५२
गॅस्ट्रो-७९


१ जून ते नोव्हेंबर २०२१
साथीचा ताप-१० हजार
टायफॉइड-२२
डेंगी-३०
मलेरिया-७०
लेप्टो-१३
स्वाईन फ्ल्यू-२
चिकन गुनिया-२
कावीळ-१००
गॅस्ट्रो-४०