धारावी-सायन रस्ता अखेर सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावी-सायन रस्ता अखेर सुरू
धारावी-सायन रस्ता अखेर सुरू

धारावी-सायन रस्ता अखेर सुरू

sakal_logo
By

धारावी, ता. २८ (बातमीदार) : धारावीतून सायनच्या दिशेला जाण्यासाठी असलेला शीव रेल्वे स्थानकासमोरील रस्ता अखेर सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने १८ नोव्हेंबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. त्‍याची दखल घेत पालिका व वाहतूक विभागाने कारवाई केल्‍याने नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.
शीव रेल्वे स्थानकासमोरील रस्ता वाहतूक विभागाने बंद केल्याने धारावीतील रहिवाशांची अडचण निर्माण झाली होती. नागरिकांना लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरून स्थानकाला वळसा घालून कुर्ला येथील महाराष्ट्र वजन काटा येथून जवळपास अर्धा किलोमीटर फिरून यावे लागत होते. त्‍यामुळे वाहतूक विभागाने शीव रेल्वे स्थानकासमोरील रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक विभागाला दिलेल्या निवेदनात केली होती. यासंदर्भात ‘सकाळ’ मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्‍यावर पालिकेने व वाहतूक विभागाने हा रस्ता सुरू केला आहे.

विद्यार्थ्यांसह पालकांची गैरसोय दूर
धारावीतून सायन येथील साधना हायस्कूल, डी. एस. हायस्कूल, पी. एस. डब्ल्यू. हायस्कूल, येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची सुविधा नसल्याने पालकच विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करतात; मात्र सायनला जाणारा जवळचा रस्ता बंद असल्याने पालकांना थेट कुर्ल्याच्या दिशेने जाऊन पुन्हा माघारी यावे लागत होते. त्‍यातच वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचता येत नव्हते; मात्र आता हा रस्‍ता सुरू झाल्‍याने त्‍यांची गैरसोयही दूर झाली आहे.

पाठपुराव्‍याला यश
वाहतूक विभागाने धारावीकरांचा विचार न करता हा रस्ता बंद केल्‍याचा आरोप स्‍थानिकांनी केला होता. तसेच वाहतूक विभागाने यावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन केले जाण्याचा इशारा मनसेचे शाखा अध्यक्ष संदीप कदम यांनी दिला होता. तसेच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धारावी विधानसभा क्षेत्राचे उपविभाग समन्वयक गणेश खाडे, ओमकार विश्वकर्मा यांनी याप्रश्नी पाठपुरावा केला होता. त्‍याला अखेर यश आले आहे.