लोंबकळणाऱ्या वीजतारा धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोंबकळणाऱ्या वीजतारा धोकादायक
लोंबकळणाऱ्या वीजतारा धोकादायक

लोंबकळणाऱ्या वीजतारा धोकादायक

sakal_logo
By

मनोर, ता. २८ (बातमीदार) : नागझरी-किराट रस्त्यावर वीजवाहिन्या धोकादायक पद्धतीने लोंबकळत आहेत. लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांमधून विजेचा प्रवाह सुरू असल्याने रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना स्पर्श झाल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी विजेचा खांब कोसळून बोईसर एमआयडीसीमध्ये एका कामगाराचा मृत्यू होता. त्यामुळे लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या बदलण्याची मागणी महावितरण कंपनीकडे नागरिकांकडून केली जात आहे.
उद्योगांना चालना देण्यासाठी महावितरण कंपनीकडून बोईसर-चिल्हार रस्त्यालगतचे वीजवाहिन्यांचे जीर्ण झालेले खांब बदलण्यात आले आहेत; तर वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत; परंतु महावितरण कंपनीकडून ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांचे जीर्ण झालेले जाळे बदलले जात नसल्याने जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या रस्त्यावर लोंबकळत असतानाचे चित्र सामान्य आहे.
नागझरी-रावते रस्त्यालगत मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग निर्मितीचे काम सुरू आहे. कंत्राटदार मोंटो कार्लो कंपनीचा कॅम्प रावते गावच्या हद्दीत उभारण्यात आला आहे. महामार्गाच्या कामासाठी नागझरी-रावते रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या अवजड वाहनांना स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागझरी-किराट रस्त्यावर धोकादायक पद्धतीने लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या आणि जीर्ण झालेले खांब बदलण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांकडून होत आहे.

.......................
नागझरी-किराट रस्त्यावर लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांची पाहणी करण्यात आली आहे. वीजवाहिन्या बदलण्याची आवश्यक असून त्याबाबत अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. आठवडाभरात लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती केली जाईल.
- प्रशांत राठोड, सहायक अभियंता, महावितरण, बोईसर

................................

डीपींचे बॉक्स उघडे, मोडकळीस आलेले खांब
ग्रामीण भागात वीजवाहिन्यांचे खांब आणि वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीकडे महावितरणकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्या धक्कादायक पद्धतीने लटकताना दिसतात. रस्त्याच्या मधोमध असलेले खांब आणि झाकणे तुटून उघड्या असलेल्या डीपी बॉक्स आढळून येतात. ग्रामीण भागातील वीजपुरवठा करणाऱ्या पायाभूत सुविधांच्या सुधारणा करण्यासाठी महावीतरण उदासीन असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.