
माकपचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच
वाडा, ता. २८ (बातमीदार) ः ओला दुष्काळ जाहीर करा, बेरोजगार मजुरांना प्रत्येकी १५ हजार नुकसान भरपाई द्या, वनजमीन कसणाऱ्यांच्या नावे करा आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. सोमवारी (ता. २८) आंदोलनाचा तिसरा दिवस होता. प्रशासनाने योग्य दखल न घेतल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे माकपचे तालुका सचिव चंद्रकांत धांगडा व प्रकाश चौधरी यांनी सांगितले.
वनजमीन मोजून ती कसणाऱ्याच्या नावे करावी, आदिवासी व बिगर आदिवासी दावे मंजूर करा, भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्लॉटधारकांची झालेली चुकीची मागणी रद्द ठरवून पुन्हा नव्याने मोजणी करून गटबुक नकाशा द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, तालुका कृषी कार्यालयाकडून खरीप हंगामासाठी कडधान्ये बी-बियाणे व औषधांचे वाटप करण्यात यावे, प्रत्येक रेशन धान्य दुकानावर महिन्यातील प्रत्येक दिवशी शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, धान्य वितरणासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अडचण येत असल्याने त्या त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने धान्याचे वितरण करण्यात यावे, पावसामुळे दोन महिने घरी बसलेल्या मजुरांस प्रत्येकी १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, वाडा तालुक्यातील मुख्य रस्त्यापासून गावपाड्यांना जोडणारे रस्ते, मोऱ्या, साकवांची त्वरित दुरुस्ती करून ते सुस्थितीत बनवा, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, मुंबई-बडोदा महामार्गाकरिता संपादित केलेल्या जागा मालकांना मोबदला बाकी आहे तो योग्य पद्धतीने देण्यात यावा, वाडा नगरपंचायत हद्दीत विविध प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यात यावेत आदी मागण्या माकपकडून करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.