
धावत्या रेल्वेवर दगड भिरकावल्याने महिला जखमी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ ः चालत्या रेल्वेवर दगड फेकल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. २८) आंबिवली-शहाड रेल्वेस्थानकांदरम्यान घडली. या महिलेच्या डोळ्याला मार लागला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
नांदेडहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणारी राज्यराणी एक्स्प्रेस ही सोमवारी सकाळी ८.३० च्या दरम्यान आंबिवली स्थानकाजवळून जात असताना एक्स्प्रेसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या रखमाबाई पाटील (वय ५५) यांच्या डोळ्याजवळ दगड लागल्याने त्या जखमी झाल्या. कल्याण रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस थांबल्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. रखमाबाई या दिवा येथे राहत असून त्या नांदेडहून दिवा येथे येण्यासाठी आपल्या परिवारासह प्रवास करीत होत्या. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. चोरी, लुटीच्या उद्देशानेच ही घटना झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
रेल्वे रुळाजवळील झोपडपट्टी परिसरातून अनेकदा लोकल, मेल-एक्स्प्रेसवर दगड भिरकावले जातात. प्रवाशांजवळील सामान पडून ते चोरी करता यावे या उद्देशाने अनेकदा ही दगडफेक होते. ७ नोव्हेंबरला ठाणे-कळवादरम्यान लोकलवर दगडफेक केल्याने यामध्ये प्रवाशाच्या नाकाला दुखापत झाली होती. त्यानंतर माहीम ते वांद्रेदरम्यान जलद मार्गावरील लोकलवर दगडफेक झाल्याने तरुणीच्या कपाळावर मार लागला होता. अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.