
दारुमुक्त खारघर लढ्याला यश
नवीन पनवेल, ता. २८ (वार्ताहर)ः पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीत २००५ मध्ये खारघर गाव व कॉलनीमध्ये दारुबंदी करण्यात यावी असा ठराव पारित केला होता. खारघर ग्रामपंचायतीने केलेला हा ठराव महापालिकेने कायम ठेवला असून खारघर ग्रामपंचायतीमधील क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीचे धोरण प्रशासकीय महासभेत कायम ठेवल्याने खारघरच्या लढ्याला यश मिळाले आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी प्रशासकीय महासभा मुख्यालयात झाली. या वेळी पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीने २००५ मध्ये संपूर्ण खारघर गाव व कॉलनीमध्ये दारुबंदी करण्यात यावी असा ठराव पारित केला होता. त्यामुळे आजतागायत खारघर शहरात दारू विक्रीवर बंदी होती, पण रायगड जिल्हा महसूल विभागाने खारघरमध्ये निरसुख पॅलेसला बारचा परवाना दिला आहे. याविरोधात सर्व पक्षीय संघर्ष समितीने एकत्र येऊन शासनाने खारघरमध्ये बार आणि दारू दुकानास परवानगी देऊ नये यासाठी निवेदन दिले होते; मात्र असे असताना प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने रविवारी (ता. २७) आंदोलन करण्यात आले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेत खारघर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दारूबंदीबाबत झालेला ठराव महापालिकेने अधिक्रमित केला नसल्याने ग्रामपंचायतीचे लोकोपयोगी धोरण व्यपगत होण्याचा प्रश्न येत नसल्याचे सांगत या धोरणास प्रशासकीय महासभेत अनुमती दिली आहे.