शेअरबाजार विक्रमी उंचीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअरबाजार विक्रमी उंचीवर
शेअरबाजार विक्रमी उंचीवर

शेअरबाजार विक्रमी उंचीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ ः आज साडेतीन टक्के म्हणजेच ९१ रुपये वाढलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमुळे सेन्सेक्स ६२,५०४.८० अंशांनी; तर निफ्टी १८,५६२.७५ अंशांनी सर्वकालिक उच्चांकावर पोहोचले. चांगली भारतीय आर्थिक परिस्थिती व अमेरिकी व्याजदरवाढ मंदावण्याची शक्यता, यामुळे सेन्सेक्स व निफ्टीने सर्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली.

आजच्या तेजीमुळे बीएससीवरील सर्व गुंतवणूकदारांची एकत्रित संपत्ती १.३२ लाख कोटी रुपयांनी वाढली. शुक्रवारी बीएससीवरील सर्व शेअरचे एकूण भांडवली बाजारमूल्य २८४.५६ लाख कोटी रुपये होते; तर आज ते २८५.८९ लाखकोटी रुपये झाले.

चीनमधील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे आज आशियाई शेअरबाजार तोट्यात होते; तर युरोपीय शेअरबाजार संमिश्र होते. त्यामुळे आज सकाळी व्यवहारांना सुरुवात होताना भारतीय शेअरबाजारही काही काळ तोटा दाखवत होते; मात्र अल्पावधीतच सर्व स्तरांवर खरेदी सुरू झाल्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी वाढले आणि दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी सर्वकालिक उच्चांक नोंदवला. शेवटच्या तासाभरात नफा वसुली झाल्यामुळे निर्देशांक किंचित घसरले. दिवसअखेरीस सेन्सेक्स २११.१६ अंश वाढला; तर निफ्टी ५० अंश वाढला.

आज व्यवहार सुरू असताना निफ्टीने १८,६१४.२५ असा सर्वकालिक उच्चांक नोंदवला होता. नंतर तेथून तो खाली घसरला. निफ्टीचा आतापर्यंतचा सर्वकालिक उच्चांक मागील वर्षी १९ ऑक्टोबर रोजी १८,६०४ चा होता. तो आज तोडण्यात आला, तसेच सेन्सेक्सनेही प्रथमच ६२,५०० चा टप्पा गाठला आहे.

गेल्या पंधरा दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती २० टक्के घसरल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच चलनवाढही कमी होण्याची शक्यता असल्याचेही जाणकार दाखवून देत आहेत. त्यातच अमेरिकन फेडरल बँकेनेही व्याज दरवाढीचा वेग मंदावण्याचे संकेत दिले असल्यामुळे तेजीत भर पडली. आता निफ्टी सध्या तरी एकोणीस हजारांच्या दिशेने निघाला आहे. मात्र दोलायमान जागतिक परिस्थितीमुळे अधूनमधून त्यात अस्थिरता येण्याची शक्यता असल्याचेही जाणकारांचे मत आहे.

आज सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी १७ शेअरचे भाव वाढले; तर निफ्टीच्या मुख्य ५० शेअरपैकी २५चे भाव वाढले. आजची तेजी मुख्यता रिलायन्समुळे झाली, त्याखेरीज नेसले, एशियन पेंट, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, विप्रो, आयसीआयसीआय बँक हे प्रमुख शेअर पाऊण ते दीड टक्का वाढले; तर टाटा स्टील, एअरटेल, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, महिंद्र आणि महिंद्र, एचसीएल टेक या शेअर्सचे भाव पाऊण ते सव्वा टक्का कमी झाले. आज एनएससी वरील १,१८५ शेअरचे भाव वाढले; तर ८१५ शेअरचे भाव कमी झाले.

चांगल्या वातावरणाचे संकेत
--------------------------------
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी सुरूच ठेवली आहे; तर कच्च्या तेलाच्या किमतीही आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत आहेत. त्यामुळे भारतातील तेजी वाढण्यास मदत झाली. त्यातच भारतीय कंपन्यांची चांगली कामगिरी, जीएसटीचे विक्रमी संकलन आणि अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे चलनवाढीचा मंद झालेला वेग हे चांगल्या वातावरणाचे संकेत आहेत, असे आयसीआयसीआय डायरेक्टचे पंकज पांडे म्हणाले.