मुंबई शहरच्या प्रारूप आराखड्यास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई शहरच्या प्रारूप 
आराखड्यास मान्यता
मुंबई शहरच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

मुंबई शहरच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ ः मुंबई शहर जिल्ह्याच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या साडेचारशे कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या आराखड्यात १३५ कोटींची वाढ झाली आहे.
पालकमंत्री व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया, असे आवाहन केसरकर यांनी यावेळी केले. मुंबई हे राज्याचे हृदय असून तिच्या वैभवात अधिक भर घालून नवीन झळाळी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रूग्णालयांमध्ये अधिक सुविधा, कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास, पोलिस वसाहतींची दुरूस्ती, कामगार कल्याण केंद्राच्या मैदानाला आधुनिक स्वरूप देणे आदींवर या आराखड्यात भर देण्यात येईल. मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात येऊन शहरात रोजगार निर्मिती वाढविली जाईल. शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी लवकरच सामंजस्य करार करण्यात येतील, असेही केसरकर यांनी सांगितले. मुंबईतील फॅशन स्ट्रीट, भेंडीबाजार, बाणगंगा, भायखळा आदी ठिकाणी सायंकाळनंतर खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था करण्याचा मानस असल्याचे केसरकर म्हणाले. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ज्या मुद्यांवर अद्याप कार्यवाही झालेली नाही त्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार अरविंद सावंत, आमदार कालिदास कोळंबकर, अजय चौधरी, सदा सरवणकर, सुनील शिंदे, अमीन पटेल, तमिल सेलवन, ॲड. मनीषा कायंदे, यामिनी जाधव तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
---
शिवडी किल्ल्यातील
अतिक्रमणे हटविणार
शिवडी किल्ल्यावरील अनधिकृत धार्मिक बांधकामे हटवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या समितीत जिल्हाधिकारी, मनपा अतिरिक्त आयुक्त, पुरातत्व खात्याचे अधिकारी, तसेच पोलिस उपायुक्त यांचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.