गॉस्पेल चर्चला उपायुक्तांचे अभय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॉस्पेल चर्चला उपायुक्तांचे अभय
गॉस्पेल चर्चला उपायुक्तांचे अभय

गॉस्पेल चर्चला उपायुक्तांचे अभय

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : सीवूडस् मधील बेथेल गॉस्पेल चर्चच्या आश्रमाला महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांचे अभय आहे. या आश्रमात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आश्रमातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. या आश्रमाला पाठीशी घालणाऱ्या उपायुक्त पटनिगीरे यांची येत्या आठ दिवसांत चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे आश्वासन वाघ यांना दिले आहे. याप्रसंगी भाजपच्या प्रदेश सदस्या प्रा. वर्षा भोसले, भाजपच्या महिला जिल्हा सरचिटणीस मंगल घरत यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सीवूडस्, सेक्टर-४८ मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट आश्रमातील मुलींवर तेथील पास्टर राजकुमार येशुदासन याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पास्टर येशुदासन सध्या पोलिस कोठडीत आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी या आश्रमात जाऊन पाहणी केली. मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका आणि पोलिसांकडून आश्रम ताबडतोब सील करण्यात यायला पाहिजे होता; मात्र आजही तेथे सर्रासपणे कामकाज सुरू असल्याचे निदर्शनास आले, असे वाघ म्हणाल्या. येथील अनधिकृत बांधकामाला फक्त नोटीस बजावण्याव्यतिरिवत अतिक्रमण विभागाने काहीच कार्यवाही केलेली नाही. यामध्ये महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांची भूमिका संशयास्पद वाटते. या चर्चशी डॉ. पटनिगीरे यांच्या पत्नीचा संबंधदेखील असल्याने आश्रमावर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा करताना केला.
----
बळजबरी धर्मांतरण?
तसेच या आश्रमात जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात येत असून त्याला महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे या मिशनरी ट्रस्टची, आश्रमाशी असलेला डॉ. पटनिगीरे यांचा संबंध, आश्रमावर महापालिकेने केलेली कारवाई अशा सर्व प्रकाराची येत्या ८ दिवसांत चौकशी करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली. केलेल्या कारवाईबाबत मी आठ दिवसांनी माहिती घेणार असून शासन स्तरावरदेखील या प्रकरणाच्या कारवाईची मागणी करणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.