
रेल्वेतील नोकरीच्या बहाण्याने शेकडो तरुणांची फसवणूक
मुंबई, ता. २८ : रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने शेकडो तरुणांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला दहिसर पोलिसांनी कांदिवलीतील एकता नगरमधून अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वेच्या नावाची बनावट लेटरहेड आणि नियुक्तीपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी आरोपीच्या साथीदारालाही अटक केली असून, तो रेल्वेचा मोठा अधिकारी असल्याची बतावणी करून तरुणांकडून ३० ते ८० हजार रुपये उकळत होता.
दहिसर पोलिस ठाण्यात जूनमध्ये एका महिलेने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार आरोपी जितेंद्र घाडी याने रेल्वेत तिकीट तपासनिसाची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन ५० हजार रुपये घेतले. मात्र, त्याने कोणतीही नोकरी मिळवून दिली नाही. जितेंद्रने सदर महिलेला रेल्वेचे नियुक्तीपत्रही दिले होते. मात्र, ते बनावट असल्याचे लक्षात येताच तिने दहिसर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तपासादरम्यान जितेंद्र घाडी एकता नगरमधील रहिवासी असून २०१७ पासून तो मुंबई सेंट्रलच्या रेल्वे कारशेडमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. तिथेच त्याला रेल्वेच्या नोकरीचे आश्वासन देत तरुणांची फसवणूक करण्याची कल्पना सुचली.
तपासात जितेंद्र घाडी याने नोकरीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत लेखी तक्रारी आल्या होत्या. त्याआधारे तपास करत पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे एकता नगरमधून त्याला अटक केली. त्याच्या घरातून पोलिसांनी रेल्वे तिकीट तपासनिसाची ३० ते ४० बनावट नियुक्ती पत्रे जप्त केली आहेत.
६० जणांना बनावट नियुक्ती पत्रे
आपला साथीदार जितेन पाचंगणे स्वत:ला रेल्वेचा मोठा अधिकारी असल्याचे सांगून नोकरी मागणाऱ्यांकडून ८० ते ९० हजार घेत असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी मिळून ७० हून अधिक तरुणांची रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. त्यामध्ये ६० जणांना बनावट रेल्वे नियुक्तीपत्रे दिली आहेत.