
आदिवासी सांस्कृतिक एकता संमेलन उत्साहात
कासा, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील आदिवासी एकता परिषद आयोजित आदिवासी समाजातील सर्व हुतात्मा क्रांतिवीर यांची अभिवादन रॅली व पालघर जिल्ह्याचे चौथे आदिवासी एकता सांस्कृतिक संमेलन तलासरीत आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने सर्व आदिवासी क्रांतिवीर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
आपले स्वातंत्र्य व अस्तित्व, संस्कृती व अस्मिता, जल, जंगल, जमीन व त्यांच्याशी निगडित परंपरांचे जतन व संवर्धन व्हावे म्हणून इंग्रजांशी लढताना अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. वीरमरण आलेले वेवजी गावातील आदिवासी वीर जेठ्या गांगड यांची व सर्व आदिवासी वीर यांना अभिवादन करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात तलासरी पाटीलपाडा येथून झाली व पुढे तलासरी नाक्यावर बिरसा मुंडा यांच्या चौकाला हार घालून, तारपाच्या तालावर नृत्य करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आदिवासी एकता परिषद केंद्रीय कमिटी सदस्य पांढरे काका, महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. सुनील पऱ्हाड, पालघर जिल्हा सचिव विनोद दुमाडा, जिल्हा कार्यक्रम अध्यक्ष रान उराडे, ठाणे जिल्हा सचिव दीपक फुफाने, तसेच सर्व तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महिला प्रकोष्ठ सदस्या कीर्ती वरठा, सुनील गुहे, अमोल काटकरी व संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी विचारवंत, अभ्यासक, संशोधक व हितचिंतक उपस्थित होते.
............................
हुतात्मा वीर जेठ्या गांगड यांच्या प्रतिमेचे अनावरण
आदिवासी एकता परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी डोंगरभाऊ बागुल यांच्या हस्ते मशाल पेटवून व खुटाडे काका यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात १९२० साली सुरू केलेली देवीची चळवळ म्हणून ओळखले जाणारे वारली बंडातील हुतात्मा वीर जेठ्या गांगड यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर सर्व आदिवासी वीर क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले.