प्रिमिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रिमिअर
प्रिमिअर

प्रिमिअर

sakal_logo
By

मराठी चित्रपटसृष्टीत आनंदीआनंद

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत मराठी चित्रपटांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटांसाठी हे अनुदान दुप्पट करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासंदर्भात चित्रपटसृष्टीतील मतमतांतरे.


वंदना गुप्ते ः
सरकारने उत्तमच निर्णय घेतला आहे, पण प्रेक्षकांनीही आपली जबाबदारी उचलली पाहिजे. सरकार तरी किती ठिगळं लावत बसणार. आम्ही पॅशनेटली सिनेमा करायचा, सरकार त्याला मदत करणार, पण प्रेक्षकच येत नाहीत थिएटरकडे. त्याचं काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की हा जो निर्णय घेतलाय त्यात ए आणि बी कॅटेगरी ठरवतात; पण ते अनुदान नेमकं जातं कोणाला तेसुद्धा कळत नाही. तीन वर्षांनंतर सरकारचे पैसे येतात. तोपर्यंत निर्माता पूर्णपणे डुबलेला असतो. त्यातसुद्धा ४० लाख रुपये अनुदान सांगून ३० लाख रुपये देतात. ३० लाखांचं असेल तर २० मिळतात. तेही टप्प्याटप्प्याने दिले जातात. त्यातही आता पैसे नाहीत, नंतर पैसे नाहीत असं म्हणतात. मी निर्मिती केलेल्या सिनेमासाठी आत्ता पाच वर्षांनंतर ३० लाख रुपये देण्यात आले. तेही २९ लाखच होते. कारण फिल्मसिटीमध्ये शूटिंग केल्याने एक लाख रुपये कापण्यात आले. सरकारची ही अनुदानाची प्रक्रिया पारदर्शी असावी. आणि ए, बी, सी कॅटेगरी ठरवणारी माणसं कोण? त्यासाठी पॅनेल असतं ते उत्तम असेल तर निर्मात्याला काहीतरी निदान हातभार लागल्याचा आनंद मिळेल, एवढं मला मनापासून वाटतं. चित्रपटाच्या निर्मितीत यामुळे नक्कीच वाढ होईल, पण लोकांनीही जबाबदारी ओळखून थिएटरकडे यावं. सरकारने हे उत्तमच पाऊल उचललं आहे. फक्त या अनुदानाची प्रक्रिया पारदर्शी असायला हवी एवढंच.

दिग्दर्शक सतीश राजवाडे ः
सरकार मराठी चित्रपटांवर कौतुकाची थाप मारीत आहे याचा आनंद नक्कीच होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा हा गौरव आहे. यामुळे अधिकाधिक चांगले चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चित्रपटांची निर्मिती वाढली तरी लोकांना अधिक चांगले काम करण्याची इच्छा प्राप्त होईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बक्षीस मिळवण्यासाठी आता स्पर्धा लागेल आणि त्यातूनच चांगल्या कलाकृती निर्माण होतील. प्रेक्षकांना उत्तम आणि सकस मनोरंजन मिळेल.

कांचन अधिकारी ः
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांना सरकार दुप्पट अनुदान देणार ही घोषणा खरोखरच छान आहे. मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे सकस आणि चांगल्या कलाकृती निर्माण होतील. प्रेक्षकांना चांगले मनोरंजन मिळेल. निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची जबाबदारी वाढेल. त्यांच्यामध्ये चांगली कलाकृती देण्याची निकोप स्पर्धा लागेल; परंतु पुरस्कार निवडीमध्ये चांगली आणि अभ्यासू मंडळी असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी निर्णय देताना तो पारदर्शी असला पाहिजे.